Join us

अंबाती रायुडू मालिकेत गवसलेला मौल्यवान खेळाडू- लक्ष्मण

मालिकेतील मोठी कमाई म्हणजे नंबर चारसाठी गवसेला अंबाती रायुडू. चौथ्या स्थानासाठी अंबाती फिट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:04 IST

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मण पुण्यातील पराभव डोळ्यात अंजन घालणारा होता. यातून धडा घेत भारताने विंडीजविरुद्ध पुढील दोन्ही सामन्यांवर विजयी वर्चस्व गाजवित मायदेशात सहावा एकदिवसीय मालिका विजय साजरा केला. मुंबई आणि त्रिवेंद्रम येथील विजय प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजविणारे होते.रोहितने ब्रेबॉर्नवर तडाखेबंद १६२ धावा ठोकल्या तर विराटने संपूर्ण मालिकेत धावांचा पाऊस पाडून मालिकावीराचा किताब जिंकला. एकदिवसीय सामन्यात सलग तीन शतकांची नोंद करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. पहिल्या तीन फलंदाजांच्या अपयशानंतर मधल्या फळीने कामगिरी करावी, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असते. पण मधली फळी ढेपाळली तर काय? सध्याच्या मालिकेद्वारे संघ व्यवस्थापनाने या प्रश्नांची सोडवणूक केली असावी.या मालिकेतील मोठी कमाई म्हणजे नंबर चारसाठी गवसेला अंबाती रायुडू. चौथ्या स्थानासाठी रायुडू फिट आहे. ‘स्ट्राईक रोटेट’ करणे असो की पडझड थोपविणे असो, या स्थानावरील फलंदाजाला बाजू सावरण्याचे मोठे आव्हान पेलावे लागते. रायुडू हा फिरकी आणि वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड देत धावफलक देखील हलता ठेवण्यात तरबेज आहे. चौथ्या स्थानासाठी त्याच्यावर विश्वास दाखविणे आणि त्याच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा बाळगणे गैर नाही. तो फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळला नसला तरीही अनुभवात कमी नसल्यामुळे संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरला आहे.अन्य एक सकारात्मक बाब म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याच्यात होणारी प्रोत्साहनात्मक सुधारणा. डावखुरा वेगवान गोलंदाज या नात्याने तो फलंदाजाच्या दोन्ही बाजूने चेंडू वळविण्यात यशस्वी ठरत आहे. विश्वचषकासाठी सज्ज होण्यास त्याच्याकडे पुरेसा वेळ देखील उपलब्ध आहे. याशिवाय रवींद्र जडेजाचा वन डेसाठी शिताफीने वापर करून घ्यायला हवा. मर्यादित षटकांच्या सामन्यात मधल्या षटकांमध्ये कमी धावा देण्यात त्याचा हातखंडा आहे. मध्यम जलद गोलंदाज हार्दिक पांड्या याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू जडेजाने पोकळी भरून काढली, असे म्हणायला हरकत नाही.

(लेखक माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत.)

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज