लंडन - भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला. वेस्टर्न स्टॉर्म क्लबचे प्रतिनिधीत्व करणा-या मंधानाने अवघ्या 19 चेंडूंत 52 धावा कुटल्या. या विक्रमी खेळीनंतर मंधानाला श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराने भेट दिली. सामना संपल्यानंतर संगकाराने थेट मंधानाची भेट घेतली. मंधानाच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण ठरला. मंधानाने संगकारासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.
मंधानाची ही विक्रमी खेळी सुरू असताना संगकारा मैदानात उपस्थित होता. मंधानाही महिला टी-20 लीगसाठी योग्य सदिच्छादूत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. मंधानाच्या 52 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तिने 18 चेंडूंत 50 धावा करताना महिली टी-20 जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याच्या या खेळीच्या जोरावर वेस्टर्न स्टॉर्म संघाने सहा षटकांच्या सामन्यात 85 धावा केल्या. प्रत्युत्तरात लाँगबोरोध लाईटनिंग क्लबला 67 धावाच करता आल्या. पावसामुळे या सामन्याची षटकसंख्या सहा करण्यात आली होती.