Join us  

प्रत्येक लढतीत काही नवे शिकणे हेच यशाचे रहस्य - बुमराह

प्रत्येक लढतीत काही नवे शिकण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यास मदत मिळाली, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:05 AM

Open in App

पल्लीकल : प्रत्येक लढतीत काही नवे शिकण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यास मदत मिळाली, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्ध तिस-या वन-डे लढतीत २७ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा बुमराह म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडून बरेच काही शिकायला मिळाले.’भारताने ६ गडी राखून मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा बुमराह म्हणाला, ‘गोलंदाज म्हणून प्रत्येक वेळी काही तरी नवे शिकणे आवश्यक असते आणि माझा नेहमी हाच उद्देश असतो. मी प्रथमच श्रीलंका दौ-यावर आलेलो असून वेगवेगळ्या वातावरणात खेळणे नेहमी आव्हान असते. मी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करीत असतो आणि सीनिअर खेळाडूंना प्रश्न विचारत असतो. कारण त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते. युवा असताना काय करायचे काय नाही, याचे ज्ञान नसते. मलिंगासारख्या गोलंदाजाच्या सातत्याने संपर्कात असल्यामुळे वेगवान गोलंदाज म्हणून छाप सोडण्यास मदत मिळाली.’ बुमराह म्हणाला, ‘मी यापूर्वीही नव्या चेंडूने मारा केला आहे. त्या वेळी मी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघातर्फे पदार्पण केले होते. मी आशिष नेहराच्या साथीने नव्या चेंडूने गोलंदाजी केली आहे. नव्या चेंडूने मारा कसा करायचा, हे अनुभवाने शिकायला मिळते. संघाच्या यशात योगदान देण्यात मला आनंद मिळतो. जर संघाला मी पहिला चेंज गोलंदाज म्हणून गोलंदाजीसाठी आवश्यक असेल तर ती भूमिका बजावताना आनंदच होईल. जर संघाला वाटत असेल, की मी नव्या चेंडूने मारा करावा तर ती जबाबदारी स्वीकारण्यासही सज्ज असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यासाठी सतत नवे काहीतरी शिकावे लागते. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करावा लागतो. जर एकसारखी रणनीती कायम राखली तर काही कालावधीनंतर ती रणनीती यशस्वी ठरत नाही.

आम्ही विजयाचा मंत्र विसरलो : कापुगेदराआमचा संघ विजयाचा मंत्र विसरलेला असून भारताविरुद्ध चौथ्या वन-डे लढतीपूर्वी आपल्यातील उणिवा दूर करण्यावर काम करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार चमारा कापुगेदराने व्यक्त केली. रविवारी तिसºया वन-डे सामन्यात भारताविरुद्ध सहा गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कापुगेदरा म्हणाला, ‘कुठलीच अडचण नसून आम्ही केवळ विजयाचा मंत्र विसरलो आहोत. मी अनेक संघांसोबत असे घडताना बघितले आहे. ज्या वेळी संघ पराभूत होत असतो अशा वेळी विजयासमीप पोहोचल्यानंतरही अडथळा पार करता येत नाही.आम्ही विजयाचा फॉर्म्युला विसरलो आहोत. आता आम्हाला एक विजय मिळवावा लागेल आणि तीच लय कायम राखण्याचा प्रयत्न करावा लागेल.’ कापुगेदराने गोलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना फलंदाजांना चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतक्रिकेटश्रीलंका