Join us

कसोटी क्रिकेट जगण्याचा मार्ग दाखवणारे- गेल

पाच दिवसाचा सामना खेळणे फारच आव्हानात्मक आहे,’असे मत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:07 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट आहे. तुम्हाला जगण्याचा मार्ग दाखवते. शिकण्याची संधी देते. आयुष्यात कशी वाटचाल करायची हिंमत दर्शवते. पाच दिवसाचा सामना खेळणे फारच आव्हानात्मक आहे,’असे मत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने व्यक्त केले आहे.‘आयुष्यातील किचकटपणा समजून घेण्यास कसोटी क्रिकेट उपयुक्त असल्याने कसोटीपेक्षा आव्हानात्मक क्रिकेट अन्य कुठलेही नाही,’ असे ‘ओपन नेटस्’ या आॅनलाईन कार्यक्रमात मयंक अग्रवालसोबत बोलताना १०३ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या गेलने सांगितले. २०१४ पासून गेल कसोटी सामना खेळला नाही. कसोटीतील अनुभवापुढे अन्य गोष्टी गौण असल्याचे सांगून मर्यादित षटकांच्या सामन्यांवर स्वत:चा ठसा उमटविणारा गेल पुढे म्हणाला, ‘या प्रकारात अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करावे लागतात तेदेखील शिस्तबद्ध खेळूनच. कठीण समयी धैर्याने तोंड देण्याचा पाठ येथेच मिळतो.’ भारताचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील काही दिवसाआधी आयुष्यात वाटचाल कशी करायची हे मी कसोटी क्रिकेटमधून शिकल्याचे सांगितले होते. गेल हा वन डे किंवा टी-२० वर अधिक लक्ष केंद्रित करतो, असा आरोप त्याच्यावर नेहमी होतो. तथापि ४० वर्षांच्या गेलने युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटवर लक्ष देण्याचा सल्ला दिला.>‘कसोटीत तुम्हाला स्वत:चे कौशल्य आणि मानसिक कणखरता तपासण्याची संधी असते. समर्पित भावनेने खेळाचा आनंद उपभोगायला हवा. खेळाडू म्हणून तुम्ही अपयशी ठरलात तरी कुणाला दुखवू नका. कधी ना कधी तुम्हालादेखील चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल, हे डोक्यात ठेवूनच स्वत:चे वर्तन सहृदयी ठेवा,’- ख्रिस गेल