Join us  

आघाडीच्या फलंदाजांनी गाजवली मालिका

दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर मालिका अत्यंत रोमांचक स्थितीत आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 3:12 AM

Open in App

- अयाझ मेमन 

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने टी२० मालिकेत झुंजार विजय मिळवला. टी२० विश्वविजेता असलेला विंडीज संघ क्रमवारीत दहाव्या स्थानी आहे. परंतु, किएरॉन पोलार्डच्या रूपात मिळालेल्या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळताना विंडीजने लढवय्या खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर मालिका अत्यंत रोमांचक स्थितीत आली होती. पण, या निर्णायक सामन्यात यजमानांनी धुवाँधार खेळ करीत मालिकेवर दिमाखात कब्जा केला. या मालिकेतील कामगिरीनुसार सादर करण्यात आलेले भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...

रोहित शर्मा (१०/७)दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत राखलेला फॉर्म विंडीजविरुद्ध कायम राखण्यात रोहित अपयशी ठरला. मात्र मुंबईतील निर्णायक सामन्यात त्याने धडाकेबाज खेळी करीत भारताच्या विजयाचा पाया रचला. आता तो भारताचा ‘मिस्टर सिक्सर’ म्हणून नावारूपास आला आहे.

लोकेश राहुल (१०/८.५)

राहुलने कसोटी संघातील आपले स्थान गमावले. मात्र सफेद चेंडूने खेळताना त्याने यंदाच्या मोसमात धमाका केला. सर्वच सामन्यांत त्याने शानदार स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. शिवाय क्षेत्ररक्षणातही राहुलने छाप पाडली.

विराट कोहली (१०/९.५)

पहिल्या व दुसºया सामन्यात केलेल्या झंझावाती खेळीतून कोहलीने टी२० क्रिकेटमधील आपल्या विध्वंसक फलंदाजीची ओळख करून दिली. मालिकेत त्याने १३ षटकार ठोकून १९०.६२ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने धावा चोपल्या. पण, या सर्व आकडेवारीपेक्षा एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याची विजय मिळविण्याची जिद्द लक्षवेधी ठरली.

शिवम दुबे (१०/५.५)

आंतरराष्ट्रीय स्तरावर नवखा असला, तरी शिवमचा आत्मविश्वास अप्रतिम आहे. विशेष करून दुसºया सामन्यात तिसºया क्रमांकावर बढती मिळाल्यानंतर त्याने झळकावलेले आक्रमक अर्धशतक शानदार होते. यासह त्याने अष्टपैलू म्हणून आपली ओळख भक्कम केली. भविष्यात तो महत्त्वाचा खेळाडू ठरणार यात शंका नाही.

रिषभ पंत (१०/४)

फलंदाजीत पंतला छाप पाडता आली नाही, तसेच यष्ट्यांमागे अजूनही तो फारसा प्रभावी ठरला नाही. त्याच्यावर असलेले दडपण आणि त्याच्याकडून ठेवण्यात आलेल्या अपेक्षा यामुळे तो दडपणाखाली आहे. पण, दडपण झुगारण्यात यशस्वी ठरला तर काही दिवसांतच त्याच्याकडून मॅच विनिंग खेळी पाहण्यास मिळू शकेल.

श्रेयस अय्यर (१०/५)

आघाडीच्या ३-४ फलंदाजांनी सर्वाधिक षटके खेळून काढल्याने अय्यरला मालिकेत फारशी संधी मिळाली नाही. ३ सामन्यांतून तो केवळ १७ चेंडू खेळला. त्याचवेळी त्याने डीपमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून छाप पाडली. सध्यातरी त्याचे संघातील स्थान सुरक्षित आहे.

रवींद्र जडेजा (१०/५)गेल्याच मालिकेत जडेजाने जबरदस्त कामगिरी करीत भारताच्या मालिकेत मोलाचे योगदान दिले होते. मात्र विंडीजविरुद्धची मालिका त्याच्यासाठी साधारण राहिली. फलंदाजी आणि गोलंदाजीत छाप पाडण्यासाठी त्याला कमी संधी मिळाली. दोन सामन्यांत २ बळी मिळविताना त्याने ६ षटके मारा केला आणि ५२ धावा मोजल्या. गोलंदाजीत काहीसा अपयशी ठरला असला, तरी क्षेत्ररक्षणात मात्र वरचढ ठरला.

वॉशिंग्टन सुंदर (१०/४.५)

आघाडीची फळी आक्रमकपणे खेळल्याने फलंदाजीत सुंदरला संधी नव्हती. केवळ २ बळी घेतले, पण त्याचवेळी इकॉनॉमी रेट ८हून जास्त राहिल्याने त्याच्याकडून निराशा झाली. सध्या मोठी स्पर्धा असल्याने त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

कुलदीप यादव (१०/५.५)

केवळ अंतिम सामन्यात खेळताना कुलदीपने मिळविलेले २ बळी मौल्यवान ठरले. वानखेडेच्या सपाट खेळपट्टीवर अनेक गोलंदाज महागडे ठरले असताना, कुलदीपने छाप पाडली.

युझवेंद्र चहल (१०/६)

पहिल्या सामन्यात टिच्चून मारा करीत त्याने विंडीजला दोनशेच्या आत रोखण्यात मोलाचे योगदान दिले. पण दुसºया सामन्यात त्याला यश मिळाले नाही आणि चहल महागडाही ठरला. तरीही कोहलीच्या योजनेत चहल प्रमुख अस्त्र राहील.

भुवनेश्वर कुमार (१०/५.५)

मालिकेतील सर्व सामने खेळताना भुवीने बºयापैकी कामगिरी केली. दुखापतीमुळे तो काही काळ संघाबाहेर राहिला. पण, तरीही त्याच्या गोलंदाजीतील नियंत्रण, लय आणि अचूकता यामध्ये मात्र फारसा फरक पडला नाही.

मोहम्मद शमी (१०/८)

मोठ्या कालावधीनंतर टी२० पुनरागमन करताना शमीने वानखेडेवर भेदक मारा केला. फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर त्याने नियंत्रित मारा केला. २ बळी घेत शमीने आपला सध्याचा फॉर्म शानदार असल्याचे सिद्ध केले. यामुळे आता शमी टी२०मध्येही सातत्याने खेळला पाहिजे.

दीपक चहर (१०/७.५)

मालिकेत चहरने ९.६५ च्या इकॉनॉमी रेटने मारा केला. पण पूर्ण मालिकेत खेळपट्टी फलंदाजीस पोषक होती हेही लक्षात घ्यावे लागेल. त्याने भारताकडून सर्वाधिक ३ बळी घेतले. यामुळे तो महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याच्याकडे कौशल्य आहे. सध्याच्या गोलंदाजी आक्रमणात दीपक महत्त्वाचा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्माभारतयुजवेंद्र चहल