Lasith Malinga Named Fast Bowling Consultant Of Sri Lanka Cricket Team : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी माजी जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. तो श्रीलंकेनं क्रिकेट संघासोबत जलदगती गोलंदाजांसाठी सल्लागार प्रशिक्षक (Consultant-Fast Bowling Coach) रुपात काम पाहणार आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तो संघाची साथ सोडणार आहे. जाणून घेऊयात त्यामागची सविस्तर बातमी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मलिंगावर मोठी जबाबदारी दिली, पण...
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, लसिथ मलिंगा शॉर्ट टर्म बेसिसवर संघासोबत काम करत आहे. त्याची नियुक्ती ही १५ डिसेंबरला करण्यात आली असून २५ जानेवारी २०२६ पर्यंत तो संघासोबत असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. ही माहिती देखील बोर्डाने नियुक्तीनंतर १५ दिवसांनी दिली आहे. त्यामुळेच श्रीलंकन बोर्डाला या निवडीतून काय साध्य करायचे आहे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
हा निर्णय समजण्यापलिकडचा, कारणही गुलदस्त्यातच
लसिथ मलिंगा याच्याकडे वेगवेगळ्या टी-२० लीगसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा मोठा अनुभव आहे. या दिग्गजाकडे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने फक्त ४० दिवसांसाठीच सल्लागार प्रशिक्षकपदाची जबाबदारी का दिली? किमान वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत त्याला संघासोबत ठेवण्याचा विचार का झाला नाही? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी गुलदस्त्यातच आहेत.
भारतासह श्रीलंकेच्या मैदानात रंगणार आहेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने
आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामने भारतीय मैदानासह श्रीलंकेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) च्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनल आणि फायनल भारतीय मैदानात नियोजित असून जर पाकिस्तानचा संघ सेमीसह फायनलपर्यंत पोहचला तर भारतीय मैदानातील सामने श्रीलंकेत खेळवण्यात येतील.