Join us  

Video: यॉर्कर असा टाकायचा असतो..!; लसिथ मलिंगाने अर्जुन तेंडुलकरला दिले गोलंदाजीचे धडे

Arjun Tendulkar Lasith Malinga Mumbai Indians, IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या नव्या दमाच्या गोलंदाजांना लसिथ मलिंगा देतोय ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:13 PM

Open in App

Arjun Tendulkar Lasith Malinga Yorker Mumbai Indians, IPL 2024: क्रिकेटमध्ये अचूक यॉर्करचा मारा करण्यासाठी लोकप्रिय असलेला अनुभवी लसिथ मलिंगा सध्या मुंबई इंडियन्समधील गोलंदाजांच्या पुढच्या पिढीला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेत आहे. मलिंगाने अर्जुन तेंडुलकरसह काही तरुण खेळाडूंसोबत फ्रँचायझीच्या नेट्समध्ये बॉल-आऊट सेशन आयोजित केले होते. त्यात गोलंदाजांना एक स्टंपला लक्ष्य करायचे होते आणि स्टंप उडवायचा होता. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन या वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्यानेही या कोचिंग ड्रिलमध्ये सहभाग घेतला. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एकाही गोलंदाजाला सिंगल स्टंप उडवता आला नाही. अखेर मलिंगानेच जबाबदारी स्वीकारली आणि स्टंपचा अचूक वेध घेतला.

लसिथ मलिंगा त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याने 122 सामन्यांमध्ये 19.80 च्या सरासरीने आणि 7.14 च्या इकॉनॉमी रेटने 170 विकेट घेतल्या. हा व्हिडीओ पाहून सर्व चाहत्यांना अंदाज आलाच असेल की मलिंगा अजूनही किती अचूक लक्ष्यभेद करतो. सध्याच्या IPL सीझनमध्ये मलिंगा मुंबईची जर्सी घालून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतोय. मुंबईच्या संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे अर्जुन तेंडुलकरसह इतर गोलंदाजही यष्टीपासून फार दूर गोलंदाजी करत नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे नवे गोलंदाज चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत.

दरम्यान, सध्या हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार झाल्यापासून मुंबईला फारसे यश मिळवता आलेले नाही. पहिल्या तीन सामन्यात मुंबईचा पराभव झाला. दिल्ली विरूद्ध चौथा सामना मुंबईने शेवटच्या षटकांत जिंकला. तशातच मुंबईचा धडाकेबाज खेळाडू टीम डेव्हिड म्हणाला, "हार्दिक हळूहळू चांगल्या लयीत परतला आहे. तो मागच्या वेळी मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झालाय टी२० क्रिकेटमध्ये ही गोष्ट नवी नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हार्दिकने शेवटच्या सामन्यात मधल्या फळीत आपली भूमिका चोख बजावली. तो ड्रेसिंग रूमपासून ते मैदानावर सर्व अतिशय मनमोकळा वागतो. शेवटच्या ओव्हर्समध्ये मोकळेपणाने खेळण्याची संधी तो आम्हाला देतो. हार्दिक ज्याप्रकारे संघासाठी आता खेळत आहे, तीच संघाची गरज आहे. आमच्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक हा संघाचा 'गोंद' आहे जो ११ जणांच्या संपूर्ण संघाला जोडून ठेवतो." त्यामुळे आता मुंबईची गाडी रूळावर परतेल अशी चाहत्यांना आशा आहे.

 

टॅग्स :आयपीएल २०२४लसिथ मलिंगामुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकर