मुंबई : चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघात उत्तुंग फटकेबाजी करणारे दिग्गज आहेत. दुसरीकडे लसिथ मलिंगासह चांगल्या फिरकीपटूंची उणीवही आहे. यंदा हीच बाब जेतेपदाचा बचाव करण्यास अडथळा ठरू शकते. मुंबई अबुधाबीतील सथ खेळपट्टीवर किमान आठ सामने खेळेल.
कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉक हे सलामीवीर असून गरजेनुसार ख्रिल लिनचा वापर होईल. मुंबई १९ सप्टेंबरला चेन्नईविरुद्ध सलामीला खेळेल. सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या हे मधल्या फळीचे आधारस्तंभ आहेत. खरी समस्या मात्र गोलंदाजीत ताळमेळ साधणे ही असेल. (वृत्तसंस्था)
परिस्थितीशी एकरूप होणे अवघड : बोल्ट
यूएईतील दमट हवामानाशी ताळमेळ साधणे अवघड आव्हान असल्याचे मत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ ट्रेंट बोल्टने व्यक्त केले. गतवर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला बोल्ट म्हणाला, ‘मलिंगाने माघार घेतल्याने मोठी जबाबदारी आली. आमच्यापुढे सर्वांत अवघड आव्हान असेल ते वाळवंटात ४५ अंश सेल्सियस तापमानात स्वत:ला कायम ठेवण्याचे. माझ्या न्यूझीलंडमध्ये नहमी थंड वातावरण असते. सध्या तेथे ७-८ अंश तापमान आहे. यूएईतही मी काही सामने खेळले असून तो अनुभव फायदेशीर ठरेल.’