Join us  

KXIP vs SRH : जगदीशा सुचिथच्या 'Super Catch' नं सामन्याला दिली कलाटणी; SRHचे ७ फलंदाज १४ धावांत माघारी, Video

१२६ धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी SRHला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मनीष पांडे व विजय शंकर यांनी संघाला विजयासमीप नेले होते, परंतु अखेरच्या तीन षटकांत KXIPनं दमदार कमबॅक केले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 12:02 AM

Open in App

KXIP vs SRH Latest News : सलग तीन विजय मिळवत आगेकूच करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि सनराजयर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातला सामना जबरदस्त चुरशीचा झाला. १२६ धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी SRHला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मनीष पांडे व विजय शंकर यांनी संघाला विजयासमीप नेले होते, परंतु अखेरच्या तीन षटकांत KXIPनं दमदार कमबॅक केले. ख्रिस जॉर्डननं १९व्या षटकात सलग दोन धक्के देत सामनाच फिरवला. अर्शदीप सिंगनं अखेरच्या षटकांत दोन विकेट्स घेत पंजाबचा विजय पक्का केला. हैदराबादनं अखेरच्या चार षटकांत 14 धावांत 7 फलंदाज गमावले. पंजाबनं आजच्या विजयासह प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. पण, या सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो बदली खेळाडू म्हणून आलेला जगदीशा सुचिथ यानं घेतलेला झेल. 

लोकेश राहुल व मनदीप सिंग यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. शुक्रवारी रात्री मनदीप सिंग याचे वडील यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते दुःख बाजूला सोडून मनदीप मैदानावर उतरल्यानं साऱ्यांनी त्याचे कौतुक केलं. पण, तो १७ धावांवर माघारी परतला. ख्रिस गेलनं सुरुवात तर चांगली केली, परंतु जेसन होल्डरनं त्याला ( २०) बाद केले. पुढच्याच षटकात राशिद खाननं KXIPचा कर्णधार राहुलला ( २७) त्रिफळाचीत केले. ग्लेन मॅक्सवेलचा फ्लॉप शो  याही सामन्यात कायम राहिला. संदीप शर्मानं त्याला १२ धावांत माघारी पाठवले. दीपक हुडा ( ०), ख्रिस जॉर्डन ( ७) आणि मुरुगन अश्विन ( ४) हेही झटपट माघारी परतले. संदीप शर्मा, राशिद खान व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. निकोलस पूरननं ( ३२*) पंजाबला ७ बाद १२६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी हैदराबादला एकहाती विजय मिळवून देईल, असे वाटत असताना रवी बिश्नोईनं हैदराबादला झटका दिला. वॉर्नर २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मुरुगन अश्विननं १९ धावांवर बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमीनं हैदराबादला तिसरा धक्का देताना अब्दुल समदला ( ७) माघारी जाण्यास भाग पाडले. हैदराबादची गाडी रुळावरून घसरताना दिसत होती. 

विजय शंकर आणि मनीष पांडेंनी संयमी खेळ करताना ही पडझड थांबवली, परंतु त्यांची ३३ धावांची भागीदारी ख्रिस जॉर्डननं संपुष्टात आणली. विजय शंकरही २६ धावांवर माघारी परतला. बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवर विजय शंकरनं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धाव घेताना निकोलस पूरननं केलेला थ्रो शंकरच्या हेल्मेटवर आदळला अन् तो जमिनीवर लोळला. त्यानंतर तातडीनं वैद्यकीय टीमनं मैदानावर धाव घेतली. १९व्या षटकात जॉर्डननं हैदराबादला सलग दोन धक्के देताना सामन्याचे चित्र बदलले. अर्शदीपनं अखेरच्या षटकात सलग दोन विकेट घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबनं १२ धावांनी हा सामना जिंकला.  सामना कुठे फिरला?१२६ धावांचा पाठलाग करताना हैदराबाद ३ बाद १०० अशा मजबूत स्थितीत होते. पण, १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर मनीष पांडेनं खणखणीत फटका मारला, परंतु जगदीसन सुचिथनं सीमारेषेवर अफलातून झेल घेत हैदराबादला धक्का दिला. त्यानंतर हैदराबादचे उर्वरित ७ फलंदाज अवघ्या १४ धावांवर माघारी परतले.पाहा व्हिडिओ...

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबसनरायझर्स हैदराबाद