Join us  

KXIP vs RR Latest News : 'Universe boss' ख्रिस गेलचा भीमपराक्रम, ट्वेंटी-20 हा विक्रम मोडणे अशक्य!

ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 9:05 PM

Open in App

सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. उभय संघांसाठी ही  लढत करा अथवा मरा अशा धर्तीची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघ कंबस कसून मैदानावर उतरले आहेत. या सामन्यात ख्रिस गेलनं ( Chris Gayle) एक भीमपराक्रम केला. 

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथचा हा निर्णय जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकात योग्य ठरवला. जोफ्रानं टाकलेल्या बाऊंसरनं KXIPचा ओपनर मनदीप सिंग याला चकवा दिला आणि बेन स्टोक्सनं अशक्य वाटणारा कॅच टिपून RRला पहिलं यश मिळवून दिलं. चौथ्या षटकात ख्रिस गेलला १२ धावांवर असताना जीवदान मिळालं. वरुन आरोनच्या चेंडूवर गेलनं उंच फटका मारला आणि रियान परागच्या हातून तो सुटला. त्यानंतर गेल व लोकेश राहुलची गाडी जी सुसाट सुटली ती रोखताना RRच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आले. 

ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. यंदाच्या आयपीएलमधील हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरलं. लोकेश राहुलही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु बेन स्टोक्सनं त्याला माघारी पाठवलं. राहुलनं ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ४६ धावा केल्या. त्यानं गेलसह दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. त्यानंतर गेल व निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीनं अबु धाबीत कॅरेबियन फ्लेवर आणला. गेलनं या सामन्यात ७ वा षटकार खेचून १००० षटकारांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. 

  • आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ५+ षटकार मारण्यात गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्यानं २९ वेळा हा पराक्रम केला. एबी डिव्हिलियर्स ( १८), किरॉन पोलार्ड ( १२), शेन वॉटसन ( ११) व रोहित शर्मा ( १०) यांचा क्रमांक येतो 
  • गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११ स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात सहावेळा त्याने २२ पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक चौकार (१०२६) लगावण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.
  • गेलनं 409 ट्वेंटी-20 सामन्यांत 13,473 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतकं व 84 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर 80 विकेट्सही आहेत.
  • IPLच्या चार पर्वांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यानं 2011 ( 44 षटकार), 2012 ( 59 षटकार), 2013 ( 51 षटकार) आणि 2015 ( 38 षटकार) या पर्वांत ही कामगिरी केली आहे. या चारही पर्वात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळला होता.
  • 2013मध्ये त्यानं RCBकडून खेळताना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद 175 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 17 चौकारांची आतषबाजी केली होती. ट्वेंटी-20त एका सामन्यात सर्वाधिक 18 षटकाराचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. पण, त्यानं हा विक्रम बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये केला होता.
  • IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्स ( 232 षटकार) आणि महेंद्रसिंग धोनी ( 216) यांचा क्रमांक येतो. ट्वेंटी-20त गेलनंतर सर्वाधिक षटकारांचा विक्रम किरॉन पोलार्डच्या ( 690) नावावर आहे. रोहित शर्मा ( 376) आणि विराट कोहली ( 296) हे कोसो दूर आहेत.
  • IPL मध्ये सर्वाधिक 344 षटकारांचा विक्रम गेलच्या नावावर आहे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 993 षटकार होते.
टॅग्स :IPL 2020ख्रिस गेलकिंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स