- सौरव गांगुली लिहितात...
कसोटीलाच खरे क्रिकेट का मानले जाते, हे एजबस्टनच्या पहिल्या कसोटीतील निकालाने सिद्ध केले. निकाल दोलायमान स्थितीत उभय संघांकडे झुकत होता. पण अखेर श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी विश्वासाने जो संघ मैदानात उतरला होता, त्या इंग्लंडचा विजय झाला.
विराट मात्र अप्रतिम खेळला. विपरीत परिस्थितीत न डगमगता त्याची बॅट तळपत राहिली. फटक्यांची निवड आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची वृत्ती अद्वितीय होती. याच कारणास्तव विराट विश्व क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. सामन्यादरम्यान तो पूर्णपणे लयमध्ये नव्हता, पण त्याचा सामन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र अप्रतिम असाच होता. एक उत्कृष्ट आणि परिपूर्ण फलंदाजाचे सर्व गुण विराटमध्ये दिसले.
प्रत्येक दिवस एखाद्यासाठी चांगला ठरत नाही. तरीही धावा काढू शकत असाल तर तुम्हाला सहकाऱ्यांची साथ लाभणे तितकेच महत्त्वपूर्ण ठरते. पण सहकाºयांनी नांगी टाकली तरी धावा काढण्याची भूक विराटमध्ये होती. तो आघाडीवर जाऊन लढणारा योद्धा ठरला. सहकाºयांची साथ लाभली असती तर भारतीय संघाला काहीही अशक्य नव्हते.
भारतीय संघाच्या सर्वात जमेची बाब म्हणजे गोलंदाजी. सर्वच गोलंदाज देखणी कामगिरी करीत आहेत. विशेषत: अश्विनच्या चेंडूतील विविधता पाहण्यासारखी होती. तो पुढेही ठसा उमटवेल. मागच्या स्तंभात मी अश्विनला महत्त्वाचा खेळाडू संबोधले होते. त्याने ही बाब खरी ठरविली, याचा आनंद आहे. अश्विनने विदेशी खेळपट्ट्यांवर स्वत:ची छाप उमटवावी, असे मला वाटते. युवा खेळाडूंकडून मिळालेल्या आव्हानानंतर अश्विनने स्वत:ची गोलंदाजी आणखी धारदार बनविली.
आॅलिव्हर पोपची इंग्लंड संघात निवड हा अश्विनचा पर्याय शोधण्याचा मार्ग आहे. अशावेळी भारतीय ‘थिंक टँक’ला दुसºया फिरकीपटूचा विचार करावा लागेल. लॉर्डस्चा इतिहास पाहिल्यास माझ्या मते कुलदीप यादव योग्य राहील. भारताला पाच गोलंदाजांच्या पर्यायावर तडजोड करावी लागेल. इंग्लंड संघात बेन स्टोक्स नसला तरी ख्रिस व्होक्समुळे संतुलन साधण्याचा प्रयत्न होत आहे. मालिकेचा निकाल या सामन्यावर अवलंबून असेल. लॉर्डस् कसोटी जिंकून भारताला बरोबरीची संधी राहील. भारतीय फलंदाज सामन्यात अपयशी ठरल्यास इंग्लंडला संधी राहील. पण फलंदाजांनी धावा केल्यास भारताला पुनरागमनापासून कुणी रोखू शकणार नाही. पाहू या, लॉर्डस्वर काय घडते, ते... (गेमप्लान)