Krunal Pandya Century Vs Hyderabad in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी २०२५ च्या हंगामातील यंदाच्या वर्षातील अखेरच्या सामन्यात बडोदा आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात धावांची 'बरसात' झाल्याचे पाहायला मिळाले. राजकोटच्या सानोसरा क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बडोद्याचा कर्णधार क्रुणाल पांड्या याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने वनडे सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः टी-२० स्टाईलमध्ये धुलाई केली. क्रुणालसह सलामीवीर नित्या पांड्या आणि अमित पासी यांच्या शतकाच्या जोरावर बडोद्याच्या संघाने निर्धारित ५० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर ४१७ धावा लावल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाकडून अभिरथ रेड्डी (Abhirath Reddy) आणि प्रज्ञेय रेड्डी यांनी शतके झळकावली. पण शेवटी बडोद्याच्या संघानेच बाजी मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रुणाल पांड्याचा ‘विराट’ अवतार; १८ चौकार आणि एका षटकारासह ठोकल्या नाबाद १०९ धावा
हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बडोद्याच्या संघाच्या सलामीवीरांनी शतकी खेळी करत हा निर्णय फोल ठरवला. नित्या पांड्या १२२(११०) आणि अमित पासी १२७ (९३) यांच्या शतकानंतर कर्णधार क्रुणाल पांड्या याने अवघ्या ६३ चेंडूंमध्ये नाबाद १०९ धावा करत मोठा धमाका केला. या खेळीत त्याने १८ चौकार आणि एक षटकार मारला.
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
RCB चा आनंद गगनात मावेना!
क्रुणाल पांड्या हा भारतीय संघातून बाहेर आहे. पण IPL मध्ये त्याने आपल्यातील धमक अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. २०२५ च्या IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला पहिले वहिले जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आणि २०२५ मध्ये RCB कडून तो फायनलमध्ये सामनावीर ठरण्याचा खास रेकॉर्ड क्रुणाल पांड्याच्या नावे आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील वादळी शतकी खेळीनंतर RCB नं खास पोस्ट शेअर करत क्रुणाल पांड्याच्या खेळीला दाद दिल्याचेही पाहायला मिळाले. याशिवाय, वनडे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक (२६ चेंडूत) झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हैदराबादच्या ताफ्यातून दोन रेड्डी शतकी खेळीसह चमकले, पण...
बडोदा संघाने दिलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या ताफ्यातील अभिरथ रेड्डी (Abhirath Reddy) याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९० चेंडूत १३० धावांची दमदार खेळी केली. याशिवाय विकेट किपर बॅटर प्रज्ञेय रेड्डी (Pragnay Reddy) याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ९८ चेंडूत ११३ धावा केल्या. पण ते माघारी फिरल्यावर हैदराबादच्या संघातील एकालाही मैदानात तग धरता आला नाही.