कराची : ‘विराट माझा आवडता फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीमुळे मी फारच प्रभावित असून विराटचे रेकॉर्ड सर्व काही कथन करते, असे मत पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने शनिवारी व्यक्त केले.
विराट हा उत्कृष्ट फलंदाजीमुळेच माझा आवडता फलंदाज बनू शकला, असे पाकच्या या माजी कर्णधाराने म्हटले आहे. मियांदाद याने स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंची प्रतिभा आणि त्यांच्या खेळातील सखोलता याचा ऊहापोह केला आहे. कोहलीची खेळातील आकडेवारी आणि प्रगती या गोष्टींची मियांदादने स्तुती केली.
मियांदाद म्हणाला, ‘भारतीय क्रिकेट संघात सर्वश्रेष्ठ कोण, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी विराट कोहलीची निवड केली. मला खूप काही सांगायची गरज नाही. विराटची कामगिरी आणि आकडेवारी सर्वकाही सांगते. आकडेवारी कधी खोटी नसते त्यामुळे क्रिकेटविश्वाला विराटचे श्रेष्ठत्व मान्यच करावे लागेल.’
विराटने द. आफ्रिकेत खरोखर दमदार कामगिरी केली. खेळपट्टी चांगली नसताना त्याने शतकी खेळी केली होती.