दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली वर्षाच्या शेवटी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी कायम राहणार आहे. त्याचवेळी, कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराची एका स्थानाने घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी आहे. कोहलीचे ९२८ मानांकन गुण असून तो दुसऱ्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथच्या (९११) तुलनेत बराच पुढे आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (८२२) तिसºया स्थानी आहे. यंदा ११ कसोटी सामन्यांत १०८५ धावा फटकावणारा आॅस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. पुजारा ७९१ गुणांसह पाचव्या स्थानी, तर अजिंक्य रहाणे ७५९ गुणांसह सातव्या स्थानी आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल १२ व्या स्थानी कायम असून रोहित शर्माने एका स्थानाची प्रगती करताना १३ वे स्थान गाठले आहे. भारताचे एकूण पाच फलंदाज अव्वल २० मध्ये आहेत.
गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह सहाव्या स्थानी असून आर. अश्विन (७२२) व मोहम्मद शमी (७७१) नवव्या व दहाव्या स्थानी कायम आहेत. रवींद्र जडेजा (७२५) १६ व्या, तर ईशांत शर्मा (७१६) १८ व्या स्थानी आहे. आॅसी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०२ गुणांसह अव्वल आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा नील वॅगनर (८५९) व द. आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा (८३२) यांचा क्रमांक येतो.