नवी दिल्ली- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा लवकरच मतदान करणार आहे. इन्स्टाग्रामवर कोहलीनं मतदान ओळखपत्राचा फोटो शेअर केला आहे. 30 वर्षांचा कोहली लिहितो, 12 मे रोजी मी गुरुग्राममध्ये जाऊन मतदान करणार आहे, तुम्ही मतदानासाठी तयार आहात का?, या मतदान ओळखपत्रावर कोहलीच्या संबंधित वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. मतदान ओळखपत्रावर कोहलीच्या वडिलांचं नाव आणि त्यांचा पत्ता देण्यात आला आहे.
विराट हा हरियाणातल्या गुरुग्राममधील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी कोहली दिल्लीहून गुरुग्राममध्ये वास्तव्याला आला होता. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नानंतर तो मुंबईत राहायला लागला. खरं तर त्याला अनुष्काबरोबर मुंबईत मतदान करायचं होतं. निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं की, विराटला मुंबईतल्या वरळीत मतदान करायचे होते. त्यांना त्यासाठी 30 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. पण त्यांना औपचारिकता पूर्ण करता आलेली नाही.
![]()
काय आहे पूर्ण प्रकरण?
विराट कोहलीला मुंबईतून करायचं होतं, जेथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा मतदान करणार आहे. विराट कोहलीनं ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मतदान करण्यासाठी अर्जही केला होता. परंतु विराट कोहली अर्ज करण्याआधीच वेळ निघून गेली होती. 30 मार्च हे ज्यांचं मतदार यादीत नाव नाही, त्यांच्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. विराट कोहलीनं 7 एप्रिलला अर्ज केला आहे. त्यासाठी आधीच उशीर झाला होता. निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोहलीचा अर्ज प्राप्त झाला होता. परंतु आम्ही तो प्रलंबित ठेवला होता. ते सध्या मुंबईतून मतदान करू शकणार नाहीत. कारण अर्ज करण्याची मुदत निघून गेली आहे. म्हणून त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला होता. पुढच्या निवडणुकीवेळी अर्ज आल्यास विचार करू. विराट कोहलीला वरळी मतदान केंद्रात स्वतःचं नाव नोंदवायचं होतं.