Join us  

कोहलीने दीड-दोन महिने ‘ब्रेक’ घ्यावा; त्याला सर्वाधिक विश्रांतीची गरज - रवी शास्त्री

सात सामन्यात आरसीबीकडून कोहलीने केवळ दोनदा ४० हून अधिक धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 9:33 AM

Open in App

मुंबई : ‘विराट कोहली हा थकलेला जाणवतोय. त्याने किमान दीड-दोन महिने खेळातून ब्रेक घ्यावा. या कालावधीत थकवा घालवून ताजेतवाने व्हावे आणि पुन्हा नव्या जोमाने मैदानावर पाऊल ठेवायला हवे,’ अशी सूचना भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. 

सात सामन्यात आरसीबीकडून कोहलीने केवळ दोनदा ४० हून अधिक धावा केल्या. लखनऊविरुद्ध पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. कोहलीने सर्व प्रकारात गेल्या अडीच वर्षांपासून शतक केले नाही. त्याने भारताचे आणि पाठोपाठ आरसीबीचेही नेतृत्व सोडले. वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी झाली. तरीही तो फलंदाजी करताना अडखळतोय. 

‘विराटला आहे सर्वाधिक विश्रांतीची गरज, त्याने रहावे सावध!’- शास्त्री यांनी मत मांडले की, ‘विराट देशासाठी पुढील सात-आठ वर्षे आणखी खेळू शकतो. आगामी टी-२० विश्वचषकाला चार महिने शिल्लक आहेत. अशा वेळी त्याने ब्रेक घेत ताजेतवाने व्हावे. नव्या जोमाने मैदानावर येत धडाकेबाज खेळी करावी. - कोरोना काळात सर्वच खेळाडू एका ठिकाणी थबकले आहेत. अतिव्यस्ततेमुळे विराटवर प्रचंड थकवा आल्याचे जाणवते. सर्वाधिक विश्रांतीची गरज कुणाला असेल तर ती विराटला. इंग्लंड दौऱ्याआधी दोन महिने विश्रांती घेण्यास हरकत नाही.’ - तसेच, ‘मी प्रशिक्षक असताना खेळाडूंना मानसिक विश्रांती घेण्याची सूृचना केली होती. खेळाडूंप्रति सहानुभूती बाळगण्याची गरज असते. एखाद्या खेळाडूवर तुम्ही अधिक भार टाकणार असाल तर तो शंभर टक्के योगदान देऊ शकणार नाही.  त्यादृष्टीने आम्हाला सावध राहावे लागेल,’ असे मतही शास्त्री यांनी मांडले.

खेळापासून, मीडियापासून दूर राहावे - पीटरसनइंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेदेखील शास्त्री यांच्या मताशी सहमती दर्शविली. कोहलीने नवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी काही वेळ खेळापासून आणि माध्यमांपासून दूर राहण्याचा सल्ला पीटरसनने दिला.  तो म्हणाला, ‘विराट क्रिकेटचा मोठा स्टार आहे.  काही वेळ त्याने खेळापासून आणि माध्यमांपासून अलिप्त राहावे. स्वत:ला ऊर्जावान बनविण्यासाठी सोशल मीडियापासूनही दूर रहावे.’ 

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ
Open in App