मेलबोर्न : इंग्लंडच्या यजमानपदाखाली ३० मेपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वकप स्पर्धेत विराट कोहली, इयोन मॉर्गन आणि अॅरोन फिंच सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरू शकतात, असे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलन बॉर्डरने व्यक्त केले.
१९८७ मध्ये बॉर्डरच्या नेतृत्वाखाली आॅस्ट्रेलियाने जेतेपदाचा मान मिळवला होता. बॉर्डर म्हणाला, ‘आक्रमक शैली आणि ताबडतोब सडेतोड उत्तर देण्याच्या कौशल्यामुळे कोहली मॉर्गन व फिंच यांच्या तुलनेत वेगळा कर्णधार भासतो. माझ्या मते विराट वेगळ्या प्रकारचा कर्णधार आहे. तो थोडा आक्रमक खेळाडू आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी सज्ज असतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंना कल्पना असते की, जर तुम्ही अशा कर्णधारासोबत वाद घातला तर लगेच उत्तर मिळेल.’
आॅस्ट्रेलियाकडून १७८ एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करणारा बॉर्डर मॉर्गनमुळेही प्रभावित आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
बॉर्डर म्हणाला, ‘माझ्या मते इंग्लंड संघ अनन्यसाधारण कामगिरी करीत आहे. ते वेगळ्या प्रकारच्या योजनेसह खेळत आहे. विश्वकप स्पर्धेत त्यांची योजना कितपत यशस्वी ठरते, याबाबत उत्सुकता आहे. तो एक धोकादायक संघ असून त्यांची गोलंदाजी कुठल्याही संघाला दडपणाखाली आणू
शकते.’
माजी कर्णधार बॉर्डर म्हणाला, ‘अॅरोन फिंच शानदार कामगिरी करीत आहे. संघाची त्याला योग्य साथ लाभत आहे आणि ते त्याच्या नेतृत्वामध्ये दिसत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे.’ (वृत्तसंस्था)
>विराट आक्रमक
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे जगभरातील सर्वच दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांनीही त्याच्या आक्रमकतेचे कौतुक केले आहे. तो नेहमीच उत्तर द्यायला तयार असतो, असे ते म्हणतात..