विशाखापट्टणम : विक्रमांचा नवा ‘बादशाह’, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेत त्याने हा मान स्वत:च्या शिरपेचात रोवला. दहा हजार धावा काढणारा भारताचा तो पाचवा तर जगातील १३ वा फलंदाज बनला.
सामन्याआधी त्याला दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ८१ धावांची गरज होती. २१२ व्या वन डेतील २०५ व्या डावात त्याने ही कामगिरी करीत सर्वांत कमी खेळींमध्ये अशी किमया साधण्याचा मान पटकविला. याआधीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. त्याने २५९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. सौरव गांगुली (२६३ डाव), रिकी पाँटिंग (२६६), जॅक कालिस (२७२), महेंद्रसिंग धोनी (२७३) व ब्रायन लारा (२७८) यांनी दहा हजार धावांचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेआधी विराटला २२१ धावांची गरज होती. गुवाहाटीत त्याने १४० धावा केल्या.
कोहलीने मायदेशात सर्वांत कमी डावांत चार हजार तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावांचे दोन अन्य विक्रम नोंदविले आहेत. याआधी हे दोन्ही विक्रम सचिनच्या नावे होते.
कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला. तो भारत-विंडीजदरम्यान सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज
बनला. सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध
१५७३ धावा केल्या असून कोहली मात्र सचिनच्या पुढे गेला आहे.
>कोहलीचे कौतुक
कोहलीने २०५ डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. सर्वांत कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान कोहलीने मिळविला.
- बीसीसीआय
>रचले विक्रमांचे डोंगर..
कमी दिवसांमध्ये १० हजार धावा
विराट कोहली-३,२७० दिवस
राहुल द्रविड-३,९६९ दिवस
कमी चेंडूंमध्ये १० हजार धावा
विराट कोहली-१०,८१३ चेंडू
सनथ जयसूर्या-११,२९६ चेंडू
>सर्वाधिक सरासरी
विराट कोहली - ५९.१७
महेंद्रसिंग धोनी - ५१.३०
>सचिनचा विश्वविक्रम कायम
कोहलीने सचिनचा कमी डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडला असला, तरी कमी वयामध्ये हा पराक्रम करण्याचा विक्रम मात्र त्याला नोंदवता आला नाही. कमी वयात १० हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर कायम असून त्याने ही कामगिरी वयाच्या २७व्या वर्षी केली होती. कोहलीने वयाच्या २९व्या वर्षी १० हजार क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो अशी कामगिरी करणारा सचिननंतरचा जगातील दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला.
>‘विराट’ खेळी...
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीचे चौथे दीडशतक.
सर्वाधिक दीडशतक झळकावणाºयांमध्ये जयसूर्या, गेल, आमला यांच्यासह कोहली चौथा.
विंडीजविरुद्ध सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा विरेंद्र सेहवागनंतर (२१९) कोहली दुसरा भारतीय फलंदाज.
कोहलीने सर्वात कमी ११ डावांमध्ये एका कॅलेंडर वर्षात हजार धावा पूर्ण केल्या.
असा पराक्रम करताना त्याने द. आफ्रिकेच्या हाशिम आमला (१५डाव) याला मागे टाकले. २०१२ मध्येही कोहलीने एका वर्षात हजार धावा केल्या होत्या.
कोहली विंडीजविरुद्ध सर्वाधिक ६ शतक झळकावणारा फलंदाज ठरला.
याआधी हा विक्रम हर्षल गिब्ज, हाशिम आमला आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या नावावर होता. तिघांनीही प्रत्येकी ५ शतके झळकावली आहेत.
कोहलीचे विंडीजविरुद्ध सलग तिसरे शतक. याआधी २०१२ मध्ये श्रीलंकेविरुद्धही त्याने सलग तीन शतक झळकावली आहेत.
>हे विक्रम कोहलीच्या प्रतीक्षेत
सर्वाधिक धावा
कोहलीने १० हजार धावांचा टप्पा ओलांडला असला तरी अजून काही विक्रम मोडण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १८४२६ धावा केल्या आहेत.
>सर्वाधिक शतके
या यादीतही सचिन तेंडुलकरच विराट कोहलीच्या पुढे आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. तर कोहलीने ३६ शतके, त्यांच्यात १३ शतकांचा फरक आहे. मात्र कोहलीची खेळी पाहता तो हा विक्रम लवकरच मोडू शकेल.
>द्विशतक : तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच द्विशतक झळकावले. त्यानंतर त्याचा विक्रम विरेंद्र सेहवाग, मार्टिन गुप्तील, ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांनी मोडला. त्यात रोहितने तीन वेळा द्विशतक केले. हे सर्व फलंदाज सलामीला येतात. कोहली दीडशेच्यावर चार वेळा पोहचला आहे. १८३ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
>मालिकेत सर्वात जास्त धावा
कोहलीने दक्षीण आफ्रिकेविरोधातील मालिकेत सहा सामन्यात ५५८ धावा केल्या आहेत. तो ग्रेग चॅपेल यांच्या ६८६ धावांच्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक असेल. त्याच्या पुढे तेंडुलकरसह सहा फलंदाज आहेत. मात्र त्या सगळ््या फलंदाजांनी दहा किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत म्हणजेत विश्वचषकात हा विक्रम केला आहे.
>सलग शतकांचा विक्रम
कुमार संगकारा याने विश्वचषक २०१५ मध्ये सलग चार सामन्यात चार शतके झळकावली होती. त्याचा हा विक्रमही कोहलीला नक्कीच खुणावत असेल. त्याशिवाय आठ फलंदाजांनी तीन सामन्यांत सलग शतके केली आहेत. कोहलीने दोन सलग सामन्यात शतके केली आहेत.
>शुभेच्छांचा
वर्षाव..
सॉफ्टवेअर नेहमी अपडेट होत असते... सातत्य काय असते हे विराटने दाखवून दिले आहे. ३७ व्या शतकासह त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अभिनंदन!
-वीरेंद्र सेहवाग
कोहलीची धावांची भूक अभूतपूर्व आहे. त्याचे खेळाप्रती असलेले वेड विलक्षण आहे. ३७ वे शतक व दहा हजार धावांबद्दल त्याचे अभिनंदन.
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
‘सेंच्युरी पे सेंच्युरी बार बार ... रन हुये पुरे दस हजार ..’ दहा हजार धावांचा टप्पा अविस्मरणीय.. अभिनंदन विराट.
-सुरेश रैना
वा.. काय अद्भुत खेळाडू आहे. सर्वांत जलद दहा हजार धावा काढल्याबद्दल अभिनंदन
-मोहम्मद कैफ
आम्हाला तुझा अभिमान वाटतो.. ‘तू चॅम्पियन आहेस.’
- हरभजन सिंग
...म्हणूनच विराट कोहली हा ‘विराट’ आहे.
- मायकल वॉन
आणखी एक शतक.. त्याचा दर्जा वेगळाच आहे.
- इयान बेल
>(धोनीला १० हजारासाठी अद्याप ५१ धावांची गरज आहे. २००७ साली आशिया एकादशकडून खेळताना विश्व एकादशविरुद्ध धोनीने तीन सामन्यात १७४ धावा काढल्यामुळे त्याचा ‘दसहजारी’ क्लबमध्ये समावेश झाला.)
>विराट कोहली ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्याच्या आसपासही सध्या कोणी नाही.
- टॉम मुडी
>विराट महान खेळाडू आहे, त्याचबरोबर तो चांगला माणूसही आहे. आपले कौशल्य व क्रिकेटवरील प्रेमाने त्याने क्रिकेटरसिकांना मनमुरात आनंद दिला आहे आहे. अभिनंदन !
- मोहम्मद हाफिज
>ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...
या जगात काही वाद, तुलना ह्या वर्षांनुवर्षे पिढ्यानपिढ्या चालू आहेत. त्यावरून चर्चा, वादविवाद झडत आहेत. असाच एक वाद म्हणजे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण याची होणारी तुलना. कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला व या तुलनेला पुन्हा सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीचे बहुतांश विक्रम गाठीशी बांधून सचिनने निवृत्ती स्वीकारल्यावर त्याचे विक्रम मोडणे तर दूर, त्याच्या आसपासही पोहचणे कुणाला शक्य होणार, असे भाकीत क्रिकेट पंडितांनी केले होते. पण सचिनचा अस्त होत असतानाच कोहलीचा उदय झाला.
खरंतर सचिन आणि विराट यांच्या खेळाची थेट तुलना करणे, हा या दोघांवरील अन्याय ठरेल. कारण सचिन ज्या काळात खेळला व कोहली ज्या काळात खेळतोय, त्यादरम्यान क्रिकेट मोठ्या प्रमाणात बदलले आहे. सचिनच्या काळातील संघ, गोलंदाज, मैदाने आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक आहे. सचिनला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करावा लागला होता. आॅस्ट्रेलियाचे ग्लेन मँकग्रा, मायकेल कँस्प्रोविच, गिलेस्पी, शेन वॉर्न. दक्षिण आफ्रिकेत अॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक. पाकिस्तानचे वासिम अक्रम, वकार युनुस. श्रीलंकेचे चामिंडा वास, मुरलीधरन अशा गोलंदाजांचा सातत्याने सामना करावा लागला. तर विराटचा सचिनप्रमाणे भेदक गोलंदाजांचा फारसा सामना झाला नाही. त्याकाळात भारतीय संघाच्या तुलनेत इतर संघ हे तगडे होते. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांच्याविरुद्ध सामना म्हटला की मैदानात उतरण्याआधीच प्रतिस्पर्धी मानसिक दबावामुळे बेजार होत असत. पण आज याच संघांची दादागिरी जवळपास संपुष्टात आलीय.
एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत पोहोचल्याचे मान्य करावे लागेल. बाकी तो सचिनचे किती विक्रम मोडेल आणि कधी मोडेल याचे उत्तर येणारा काळच देईल.