Join us  

कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया!

कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे, ज्याचा पहिला मान पाकिस्तानी खेळाडूनं पटकावला. त्या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी भारतीय खेळाडूला तब्बल 58 वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली. 

By स्वदेश घाणेकर | Published: January 06, 2020 1:40 PM

Open in App
ठळक मुद्देश्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन वेळा या विक्रमात स्थान पटकावलेभारताकडून महेंद्रसिंग धोनी हा एकमेव खेळाडू या पंक्तित आहेझिम्बाब्वेचा खेळाडू अव्वल स्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा हात पकडणं, आता तितकंसं सोपं राहिलेलं नाही. कसोटी, ट्वेंटी-20 आणि वन डे अशा क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटनमध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांचे वर्चस्व पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला फलंदाज म्हणून विराट कोहली,  गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनी ही नावं चटकन तोंडावर येतात. क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाची सध्याच्या फळी व्यतिरिक्त अनेक माजी दिग्गजांनी केलेले विक्रम अजूनही मोडणे कोणालाही शक्य झालेले नाही.  पण, कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे, ज्याचा पहिला मान पाकिस्तानी खेळाडूनं पटकावला. त्या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी भारतीय खेळाडूला तब्बल 58 वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली. 

यष्टिरक्षक म्हणून टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. 2014मध्ये धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यष्टिंमागील त्याचे कौशल्या वाखाण्यजोगे आहे. त्याच्यासारखी चपळता क्वचितच कोणत्या यष्टिरक्षकात पाहायला मिळाली असेल. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही भारतीय यष्टिरक्षकाला न जमलेला विक्रम धोनीनं 2013मध्ये केला. पण, या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी टीम इंडियाच्या यष्टिरक्षकाला 58 वर्ष वाट पाहावी लागली. या विक्रमाचा पहिला मान हा पाकिस्तानच्या यष्टिरक्षकानं मिळवला. असा कोणता विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं सर्वप्रथम केला?

पाकिस्तानचे इम्तीआज अहमद असे या यष्टिरक्षकाचे नाव आहे. पाकिस्तानकडून 41 कसोटी सामने खेळणाऱ्या अहमद यांच्या नावावर 2079 धावा आहेत. त्यात तीन शतकं व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी 77 झेल व 16 यष्टिचीत केले आहेत. याशिवाय त्यांनी केलेल्या अशा एका ऐतिहासिक विक्रमाच्या पंक्तित स्थान पक्क करण्यासाठी टीम इंडियाला धोनीच्या अविस्मरणीय कामगिरीची वाट पाहावी लागली. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे पहिले यष्टिरक्षक म्हणून अहमद यांचे नाव आजही इतिहासाच्या वहीत अग्रणीवर आहे. 

26 ऑक्टोबर 1955मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या लाहोर येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत अहमद यांनी ही ऐतिहासिक खेळी खेळली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या 348 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननं 561 धावा कुटल्या. त्यात अहमद यांच्या द्विशतकाचा समावेश होता. फलंदाजीला आठव्या क्रमांकावर आलेल्या अहमद यांनी 380 मिनिटे खेळताना 28 चौकारांच्या मदतीनं 209 धावा चोपल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव 328 धावांत गुंडाळताना पाकिस्ताननं 6 बाद 117 धावा करून कसोटी चार विकेट्स राखून जिंकली.

कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे ते पहिलेच यष्टिरक्षक ठरले. त्यानंतर आतापर्यंत 9 यष्टिरक्षकांनी कसोटीत द्विशतक झळकावले आणि त्यात भारताच्या धोनीचा समावेश आहे. धोनीनं 22 फेब्रुवारी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटीत 224 धावा केल्या. यष्टिरक्षकांमध्ये ही तिसरी सर्वोत्तम खेळी आहे. 

विक्रमवीर यष्टिरक्षक

  • अँडी फ्लॉवर ( झिम्बाब्वे) - 232* धावा वि. भारत, नागपूर ( 25 नोव्हेंबर 2000)
  • कुमार संगकारा ( श्रीलंका) - 230 धावा वि. पाकिस्तान, लाहोर ( 6 मार्च 2002)
  • महेंद्रसिंग धोनी ( भारत) - 224 धावा वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई ( 22 फेब्रुवारी 2013)
  • मुश्फीकर रहिम ( बांगलादेश) - 219* धावा वि. झिम्बाब्वे, ढाका ( 11 नोव्हेंबर 2018)
  • तस्लीम आरिफ ( पाकिस्तान) - 210* धावा वि. ऑस्ट्रेलिया, फैसलाबाद ( 6 मार्च 1980)
  • इम्तीआज अहमद ( पाकिस्तान) - 209 धावा वि. न्यूझीलंड, लाहोर ( 26 ऑक्टोबर 1955)
  • बीजे वॉटलिंग ( न्यूझीलंड) - 205 धावा वि. इंग्लंड, मौंट मौगानुई ( 21 नोव्हेंबर 2019)
  • अ‍ॅडम गिलख्रिस्ट ( ऑस्ट्रेलिया) - 204* वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग ( 22 फेब्रुवारी 2002)
  • ब्रेंडन कुरुप्पू ( श्रीलंका) - 201* वि. न्यूझीलंड, कोलंबो ( 16 एप्रिल 1987)
  • मुश्फीकर रहिम ( बांगलादेश) - 200 वि. श्रीलंका, गाले ( 8 मार्च 2013)  
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीपाकिस्तानझिम्बाब्वेबांगलादेशश्रीलंकाआॅस्ट्रेलिया