गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२५ मधील ३५ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा तडाखेबाज फलंदाज केएल राहुलने अवघ्या १४ चेंडूत २८ धावा केल्या, ज्यात एका षटकाराचा समावेश आहे. या षटकारासह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली असून तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या पंक्तीत सामील झाला आहे.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने आयपीएलमध्ये २०० षटकारांचा टप्पा गाठला आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो ११ वा खेळाडू ठरला आहे आणि सहावा भारतीय ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन आणि सुरेश रैना यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २५८ डावात २८६ षटकार मारले आहेत. यादीत विराट कोहली २८२ (२५१ डाव) षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर धोनी, संजू सॅमसन आणि सुरेश रैना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय १) रोहित शर्मा- २८६ षटकार२) विराट कोहली- २८१ षटकार३) महेंद्रसिंह धोनी- २६० षटकार४) संजू सॅमसन- २१६ षटकार५) सुरेश रैना- २०३ षटकार६) केएल राहुल- २०० षटकार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात आणि दिल्ली यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप ४ मध्ये आहेत. दिल्ली १० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, गुजरात ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.