भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल याने ११ वे कसोटी शतक झळकावत अनेक मोठे विक्रम मोडले. राहुलने १९७ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी केली. या शतकामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त शतक करणारा फलंदाज ठरला आहे. शिवाय, त्याने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.
केएल राहुलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आता ६ शतके पूर्ण केली आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर ५ शतके आहेत. यासह राहुलने डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.
डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज:
| फलंदाज | शतक |
| रोहित शर्मा | ९ |
| शुभमन गिल | ९ |
| ऋषभ पंत | ६ |
| यशस्वी जयस्वाल | ६ |
| केएल राहुल | ६ |
| विराट कोहली | ५ |
| मयंक अग्रवाल | ४ |
| रवींद्र जडेजा | ४ |
रोहित शर्माचाही विक्रम मोडला
केएल राहुलने सलामीवीर म्हणून कसोटी शतकांच्या बाबतीतही मोठी कामगिरी केली. या शतकासह सलामीवीर म्हणून राहुलचे हे १० वे कसोटी शतक आहे. तर, रोहित शर्माने सलामीवीर म्हणून ९ शतके झळकावली आहेत.
टीम इंडियासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक कसोटी शतके:
| फलंदाज | शतक |
| सुनील गावस्कर | ३३ |
| वीरेंद्र सेहवाग | २२ |
| मुरली विजय | १२ |
| केएल राहुल | १० |
| रोहित शर्मा | ९ |
| गौतम गंभीर | ९ |
या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १६२ धावा करू शकला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत मिळून सात विकेट्स घेतल्या. या सामन्यात टीम इंडिया आता लक्षणीय आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.