Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकेश राहुल बनणार तारणहार; संघाला सावरण्यासाठी 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलेला फलंदाज लोकेश राहुल 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 12:36 IST

Open in App

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलेला फलंदाज लोकेश राहुल 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 आणि तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत लोकेशची बॅट चांगलीच तळपली. त्यानं ट्वेंटी-20त सर्वाधिक 224 धावा केल्या, तर वन डे मालिकेत 204 धावा चोपल्या. या दोन्ही मालिकांमध्ये लोकेशनं यष्टिरक्षक आणि फलंदाज ही दुहेरी भूमिका सक्षमपणे पार पाडली. त्यानंतर सुरु झालेल्या  कसोटी मालिकेत टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे हा पराभव झाला. टीम इंडियाला आघाडीला सक्षम फलंदाजांची उणीव जाणवत आहे. आता दुसरा कसोटी सामना 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि याच तारखेला लोकेश मैदानावर उतरणार आहे.

लोकेश हा कसोटी संघाचा सदस्य नाही. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे आणि तो रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोलकाता येथे बंगाल संघाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी जाहीर झालेल्या 15 सदस्यीय कर्नाटक संघात लोकेशचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी कर्नाटक संघाला गुड न्यूज मिळाली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लोकेशला विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता तो उपांत्य सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मनीष पांडेच्या समावेशामुळे कर्नाटकची फलंदाजांची फळी मजबूत झाली होती. आता त्यात लोकेशची भर पडली आहे. मनीष आणि लोकेश हे न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिका खेळून नुकतेच मायदेशी परतले आहेत. गतवर्षी अंतिम फेरीत प्रवेश करणारा सौराष्ट्राचा संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत गुजरातचा सामना करणार आहे. पार्थिव पटेल ( गुजरात), जयदेव उनाडकट ( सौराष्ट्र) आणि मनोज तिवारी ( बंगाल) हेही नावाजलेले खेळाडू उपांत्य फेरीत खेळताना दिसतील.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुजरातनं 464 धावांनी गोवा संघावर विजय मिळवला, तर कर्नाटकने 167 धावांनी जम्मू काश्मीर संघाला नमवलं.  

टॅग्स :लोकेश राहुलभारत विरुद्ध न्यूझीलंडरणजी करंडकबंगाल वॉरियर्स