आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डनवर झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. या लढतीत सलामीवर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी केलेली तुफानी फलंदाजी हे हैदराबादच्या विजयाचं खास वैशिष्ट्य ठरलं. मात्र फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या अभिषेक शर्मा याला बोलंदाजी नडली असून, सामना संपल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलच्या नियमावलीच्या उल्लंघनप्रकरणी त्याला दोषी ठरवत त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.
कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध झालेल्या या लढतीत अभिषेक शर्माने ४८ धावांची आक्रमक खेळी करत हैदराबादच्या डावाला विस्फोटक सुरुवात करून दिली होती. मात्र सामन्यादरम्यान त्याने मैदानावर केलेलं वर्तन त्याला नडलं असून, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अभिषेक शर्मा याने आयपीएल कोड ऑफ कंडक्ट च्या कलम २.३ चं उल्लंघन केलं आहे. हा नियम अपमानास्पद किंवा अश्लील भाषेच्या वापराशी संबंधित आहे.
बीसीसीआयने अभिषेक शर्मावर कारवाई करताना त्याला सामन्यातील एकूण मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. तसेच त्याच्या खात्यामध्ये एक डिमेरिट पॉईंटही जोडला आहे. अभिषेक शर्मा यानेही त्याच्याकडून झालेली चूक मान्य केली आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या लढतीत अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन आणि नितिश रेड्डी यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांमध्ये ८ बाद २२६ धावा फटकावल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाक करताना कोलकाता नाईटरायडर्सने जोरदार सुरुवात केली होती. मात्र फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्यानं त्यांचा संपूर्ण संघ १६१ धावांत गारद झाला होता. हैदराबादने हा सामना ६५ धावांनी जिंकला होता.