कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात काल ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेला सामना प्रेक्षकांसाठी अक्षरशः रोमांचक ठरला. एकवेळ केकेआर सहज विजय मिळवेल असे वाटत असतानाच मुकुल चौधरी नावाचे वादळ मैदानात धडकले आणि त्याने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले. मुकुलच्या या धडाकेबाज खेळीमुळे लखनौने अविश्वसनीय असा विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, लखनौचा कर्णधार ऋषभ पंत देखील त्याच्या फलंदाजीने भारावून गेला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. लखनौने १४.४ षटकांत १२५ धावांवर ६ विकेट्स गमावल्यामुळे सामना केकेआरच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र त्यानंतर मुकुल चौधरीने एकहाती लढत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याने अवघ्या २७ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत केवळ गोलंदाजांनाच नाही तर प्रतिस्पर्धी संघालाही हैराण केले. या खेळीत त्याने ७ षटकार आणि २ चौकार ठोकत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
ऋषभ पंत काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना पंत म्हणाला की, “मुकुलचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही नेहमीच आमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास अशा वेळी चमत्कार घडवून आणतो.” या विजयासह लखनौने केवळ सामना जिंकला नाही, तर आयपीएलमधील आपली ताकदही पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
लखनौच्या संघाची आतापर्यंतची कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लखनौला पराभव पत्कारावा लागला. मात्र, त्यानंतर पुढील दोन सामने जिंकून लखनौच्या संघाने पुनरागमन केले. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ चार गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिल्ली आपला पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १२ एप्रिल २०२६ ला ऐकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौचा संघ आपला विजयी घौडदौड कायम ठेवते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.