आयपीएल २०२६ चा हंगाम काही महिन्यांवर असला तरी कोलकाता नाईट रायडर्स संघातून मोठी बातमी समोर आली. केकेआरच्या व्यवस्थापनाने कोचिंग सेटअपमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, चंद्रकांत पंडित यांच्याऐवजी अभिषेक नायर यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे.
प्रसिद्ध आणि अनुभवी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे मागील तीन वर्षांपासून केकेआर संघासोबत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, केकेआरने तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २०२४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र, २०२५ चा हंगाम केकेआरसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरचा संघ पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर राहिला. या खराब कामगिरीनंतर, संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत पंडित यांच्याशी असलेले संबंध संपवले.
अभिषेक नायर यांच्यासाठी केकेआरमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून झालेले पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी यापूर्वी फ्रँचायझीसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे आणि त्यांचे संघातील खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. नायर यांनी महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे, जिथे त्यांनी अनेक तरुण प्रतिभेला ओळखण्यात आणि त्यांना विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नायर यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि तरुण खेळाडूंसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंच्या कारकिर्दीवर थेट प्रभाव पाडला आहे.
बीसीसीआय लवकरच म्हणजेच नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्व फ्रँचायझींना त्यांच्या राखलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगेल. अभिषेक नायर यांच्या नियुक्तीनंतर त्यांची पहिली आणि मोठी जबाबदारी म्हणजे कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवायचे आणि कोणत्या महत्त्वाच्या खेळाडूंना लिलावासाठी मुक्त करायचे, हे ठरवणे असेल. नायर यांच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ २०२६ च्या हंगामासाठी कोणत्या खेळाडूंवर विश्वास दाखवते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.