किवी अखेरच्या षटकांमध्ये अडखळले; भारतीय गोलंदाजांनी केले पुनरागमन

सवाई मानसिंग स्टेडियममधून टी-२० भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून सुरुवात करताना रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:35 AM2021-11-18T05:35:25+5:302021-11-18T05:36:03+5:30

whatsapp join usJoin us
The Kiwis stumbled in the final overs; Indian bowlers make a comeback | किवी अखेरच्या षटकांमध्ये अडखळले; भारतीय गोलंदाजांनी केले पुनरागमन

किवी अखेरच्या षटकांमध्ये अडखळले; भारतीय गोलंदाजांनी केले पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअडखळती सुरुवात झाल्यानंतर किवींकडून अपेक्षित सावध पवित्रा घेण्यात आला. मात्र, खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर गुप्टिल-चॅपमन यांनी मोकळेपणे खेळण्यास सुरुवात केली.

जयपूर : अनुभवी मार्टिन गुप्टिल आणि युवा मार्क चॅपमन यांच्या तडाखेबंद शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात यजमान भारताविरुद्ध २० षटकांत ६ बाद १६४ धावा उभारल्या. गुप्टिलने ४२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा, तर चॅपमनने ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६३ धावा कुटल्या. 

सवाई मानसिंग स्टेडियममधून टी-२० भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून सुरुवात करताना रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर न्यूझीलंडने भारतीय खेळपट्टीचा चांगल्या प्रकारे अंदाज घेत भक्कम धावसंख्या उभारली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात डेरील मिशेलला त्रिफळाचीत करत भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. भुवीने पहिल्या १२ चेंडूंपैकी ९ चेंडू निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली.

अडखळती सुरुवात झाल्यानंतर किवींकडून अपेक्षित सावध पवित्रा घेण्यात आला. मात्र, खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर गुप्टिल-चॅपमन यांनी मोकळेपणे खेळण्यास सुरुवात केली. विशेष करून चॅपमनने आक्रमणाची सूत्रे आपल्याकडे घेत भारतीयांवर जबरदस्त हल्ला चढवला. त्याने संघाचा धावफलक वेगाने हलता ठेवताना चौफेर फटकेबाजी केली. दुसऱ्या टोकाकडून गुप्टिलनेही फटकेबाजीस सुरुवात केल्याने भारतावरील दडपण वाढू लागले.
गुप्टिल-चॅपमन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी केल्यानंतर रविचंद्रन अश्विन भारतासाठी धावून आला. त्याने चॅपमनसह ग्लेन फिलिप्सलाही बाद करत भारताला पुनरागमन करून दिले. दोन्ही फलंदाज एकाच षटकात बाद झाल्याने न्यूझीलंड पुन्हा सावध खेळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गुप्टिलने यावेळी जोरदार प्रत्युत्तर देत भारताच्या सर्वच गोलंदाजांना फटकावले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो अधिकच धोकादायक भासू लागला. अखेर दीपक चहरला आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात गुप्टिल बाद झाला आणि भारतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

भारतीयांचे पुनरागमन
इतर फलंदाजांना फारशी फटकेबाजी करता न आल्याने न्यूझीलंडना भलीमोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. भुवनेश्वरने २४ धावांत २ बळी, तर अश्विनने २३ धावांत २ बळी घेत चांगला मारा केला. अखेरच्या ५ षटकांत भारतीयांनी पुनरागमन केले.

n वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने २०१८ ला खेळल्यानंतर ५२ सामन्यांच्या अंतराने पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला.  
n जयपूर येथेच २०१२ ला रोहित शर्माने पहिल्यांदा मुंबईचे रणजी स्पर्धेत नेतृत्व केले होते. याच ठिकाणी रोहितने बुधवारी भारताचे पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदा नेतृत्व केले.
n रविचंद्रन अश्विनने ५०वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. 
n मार्क चॅपमनचे पहिले आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक.
n सलामीवीर म्हणून मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २१व्यांदा ५०हून अधिक धावांची खेळी करत डेव्हीड वॉर्नरच्या कामगिरीशी बरोबरी केली. रोहित शर्मा (२३) अव्वल स्थानी.

कसोटी मालिकेसाठी जेमिसनची माघार
n न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन याने भारताविरुद्ध कसोटी मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली. 
n कसोटी मालिकेला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. कर्णधार केन विलियम्सनसोबतच जेमिसनला कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी दिली.
n पाच दिवसांत तीन टी-२० सामन्यांचे आयोजन आणि तीन विविध शहरांचा प्रवास यामुळे चांगले खेळाडू थकू शकतात. 
n व्यस्त वेळापत्रकात खेळाडूंवरील कामाच्या ओझ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  यामुळेच आम्ही कसोटी मालिकेला झुकते माप देण्याचे ठरविले आहे, असे स्टीड यांनी सांगितले.

कोरोना नियम धाब्यावर
n भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान सवाई मानसिंग स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी कोरोना नियमावली धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. यावेळी, प्रेक्षकांसह स्थानिक पोलीसही विनामास्क पाहण्यास मिळाले. 

n कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. टी-२० मालिकेसाठी जयपूर येथील स्टेडियममध्ये प्रेक्षक उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आलेली नाही. दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल दाखविल्यानंतरच सर्व प्रेक्षकांना प्रवेश मिळत होता.  

Web Title: The Kiwis stumbled in the final overs; Indian bowlers make a comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.