Join us  

खो-खो : पुरुषांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर उपांत्य फेरीत भिडणार

पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई वि मुंबई उपनगर व सांगली वि पुणे तर महिलांमध्ये रत्नागिरी वि उस्मानाबाद व ठाणे वि पुणे उपांत्य  फेरीत भिडणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 9:16 PM

Open in App
ठळक मुद्देपुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान सांगलीने घरच्या मैदानाचा फायदा घेत ठाण्यावर मात केली.पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने नाशिकचा एक डाव २ गुणांनी सहज विजय संपादन केला. पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने नाशिकचा एक डाव २ गुणांनी सहज विजय संपादन केला.

सांगली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने द अॅम्युचर खो-खो असो. सांगली संयोजित पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई वि मुंबई उपनगर व सांगली वि पुणे तर महिलांमध्ये रत्नागिरी वि उस्मानाबाद व ठाणे वि पुणे उपांत्य  फेरीत भिडणार.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान सांगलीने घरच्या मैदानाचा फायदा घेत ठाण्यावर २८-२६ (९-१०, ०९-०८ व १०-०८)असा चुरशीच्या सामन्यात तीन मि. राखून दोन गुणांनी विजय साजरा करताना स्थानिकांची मने जिंकली. मध्यातरला एक गुणाची घेतलेली आघाडी ठाण्याला काही टिकवून ठेवता आली नाही व दुसर्‍या डावात स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर जोरदार मुसंडी मारत यजमानांनी सामना बरोबरीत आणला. त्यानंतर झालेल्या जादा डावात सांगलीने मागे वळून न पाहता १०-८ अशी गुणसंख्या नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. सांगलीच्या अरुण घुणकीने १:१०, १:३० मि. संरक्षण करत तब्बल ५ गडी गारद केले. उत्तम सावंतने १:००,२:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, सुरेश सावंतने १:५० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले व प्रथमेश शेळकेने १:१०, १:१०, १:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. तर ठाण्याच्या महेश शिंदेने १:३०, १:४०, १:१० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, लक्ष्मण गवसने १:१०, १:०० मि. संरक्षण करत तब्बल ५ गडी गारद केले व जितेश म्हसकरने १:०० मि. संरक्षण करत तब्बल ६  गडी गारद केले व ठाणेदारी करण्याचा केलेला प्रयत्न फसला.

पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने नाशिकचा १३-११ (१३-०५ व ०६) एक डाव २ गुणांनी सहज विजय संपादन केला. नाशिकाने नाणेफेक जिंकून आक्रमण निवडून मुंबईला ‘बॅक फुटवर’ टाकायची चाल त्यांच्याच अंगाशी आली व मुंबईने सहज विजयाला गवसणी घातली. मुंबईच्या श्रेयश राऊळने २:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, प्रयाग कनगुटकरने २:००, १:२० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, श्रीकांत वल्लाकाठीने २:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व प्रसाद राडीयेने नाबाद एक मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर नाशिकतर्फे दिलीप खांडवीने १:२० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, सागर काटारेने १:०० २:००, १:२० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व शशांक तरेने तीन गडी बाद करत जोरदार लढत देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.  

पुरुषांच्या तिसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने उस्मानाबादचा १७-१० असा एक डाव सात गुणांनी धुव्वा उडवला. उपनगरच्या प्रतिक देवरेने २:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, सागर घागने २:१० मि. संरक्षण केले, हर्षद हातणकरने २:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले व ऋषीकेश मुर्चावडेने २:००  मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व आपला विजय सुकर केला. तर उस्मानाबादच्या राजाभाऊ शिंदे व अविनाश आचार्यने प्रत्येकी १:०० मि. संरक्षण करत एक-एक गडी बाद केला मात्र ते आपल्या संघाचा डावाने पराभव टाळू शकले नाहीत.

पुरुषांच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने सोलापूरला १२-११ असा एक डाव एक गुणाने धोबीपछाड दिली. पुण्याच्या प्रतिक वाईकरने २:२० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, सागर लेंगरने २:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, मिलिंद कुरपेने तीन गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले तर सोलापूरच्या अजय सावंतने २:३० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, संतोष शिंदेने १:३० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व अक्षय इंगळेने तीन गडी बाद करत दिलेली लढत अपयशी ठरली.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा १५-११ (०९-०६ व ६-०५) असा ४ गुणांनी परभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. उस्मानाबादच्या ऋतुजा खरेने २:५०, १:३० मि. संरक्षण करताना ४  बळी मिळवत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. किरण शिंदेने १:४०, २:३० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवत व जान्हवी पेठेने २:०० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवत ऋतुजाला उत्तम साथ दिली तर मुंबईच्या साजल पाटीलने १:२०, २:०० मि. संरक्षण करताना ५ बळी मिळवत कडवी लढत दिली, मधुरा पेडणेकरने १:००, १:३० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवत व अनुष्का प्रभूने १:५०, १:२० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवत जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र ते विजयश्री खेचून आणू शकल्या नाहीत.

महिलांच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात रत्नागिरीने अहमदनगरचा ११-०७ असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने ३:३० मि. संरक्षण करताना ३ बळी मिळवले, अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण करताना ३ बळी मिळवले, आरती कांबळेने २:४० मि. संरक्षण केले, तन्वी कांबळेने २:४०, १:५० मि. संरक्षण केले व उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. तर नगरच्या मयूरी मृत्यालने १:२०, १:०० मि. संरक्षण करताना ३ बळी मिळवले, वैष्णवी पालवे १:००, १:३० मि. संरक्षण केले मात्र त्या आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

महिलांच्या तिसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याने सातार्‍याला ८-४ असे  एक डाव ४ गुणांनी आसमान दाखवले. ठाण्याच्या प्रियंका भोपीने नाबाद ३:२०, व नाबाद २:५० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले, रेश्मा राठोडने ३, २:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, रूपाली बडेने २:४०, ३:५० मि. संरक्षण केले व कविता घाणेकरने ३ बळी मिळवत मोठ्या विजयाला गवसणी घातली. तर सातार्‍याच्या प्रांजल माडकरने २:५० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला व प्रतिक्षा खुरंगेने २:२० मि. संरक्षण केले मात्र त्यांची खेळी त्यांच्या संघाचा पराभव टाळू शकली नाही.

महिलांच्या चौथ्या  उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने यजमान सांगलीवर १७-१४ (०८-०६ व ०९-०८) असा चुरशीच्या सामन्यात ३ गुणांनी निसटता विजय साजरा केला. पुण्याच्या स्नेहल जाधवने २:००, १:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, काजल भोरने २:२० मि. संरक्षण करताना तब्बल ७ बळी मिळवले व श्वेता वाघने नाबाद १:१०, १:२० मि. संरक्षण करताना ३  बळी मिळवले व उपांत्यफेरीचा प्रवेश निश्चित केला. तर सांगलीच्या ज्योती शिंदेने २:४०, १:०० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले, तर रीतिका मागदुमने ४ बळी गारद केले. 

टॅग्स :मुंबईनाशिक