Join us

चिराग-सात्त्विकला ‘खेलरत्न’, शमीला अर्जुन पुरस्कार

९ जानेवारीला पुरस्कार वितरण : ओजस देवतळे, अदिती स्वामी यांचाही होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:57 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांना २०२३चा मेजर ध्यानचंद खेलरत्न  पुरस्कार जाहीर झाला आहे.  वनडे विश्वचषकात शानदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, आशियाडमध्ये तीन सुवर्ण जिंकणारा नागपूरचा युवा तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे, त्याची सहकारी अदिती गोपीचंद स्वामी आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेची चॅम्पियन तिरंदाज शीतल देवी यांच्यासह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ राष्ट्रपती भवन येथे ९ जानेवारी २०२४ ला होणार असून राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याहस्ते पुरस्कारप्राप्त खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने खेळाडूंच्या नावांची शिफारस केली.

 सात्त्विक साईराज- चिराग शेट्टी यांनी या वर्षी विश्व बॅडमिंटनचे जेतेपद पटकविले. याशिवाय स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन आणि कोरिया ओपनमध्येदेखील विजेतेपद पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी स्पर्धेच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.  एप्रिल महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. बीडब्ल्यूएफ क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झालेली भारताची ही पहिलीच जोडी ठरली.  त्यांनी ऐतिहासिक थॉमस चषक जिंकून दिला शिवाय  राष्ट्रकुल स्पर्धेत  सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. शमीने वनडे विश्वचषकाच्या ७ सामन्यात २४ बळी घेतले.

अर्जुन पुरस्कार : मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंध क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (ॲथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग) , रमेशबाबू वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (अश्वारोहण), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्यप्रताप सिंग तोमर (शूटिंग), अंतिम पंघाल (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), एशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), सुनील कुमार (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो खो).

 

द्रोणाचार्य पुरस्कार : गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा ॲथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : कविता सेल्वराज (कबड्डी), मंजूषा कंवर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : जसकीरज सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई. (कबड्डी), जयंत कुमार पुशीलाल (टेबल टेनिस) मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी २०२३ : गुरुनानक देव युनिव्हर्सिटी (अमृतसर सर्वसाधारण विजेते)

टॅग्स :मोहम्मद शामी