नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या निलंबनाबाबत विचार करण्यासाठी लोकपाल नियुक्त व्हावा, अशी प्रशासकांच्या समितीची (सीओए) मागणी आहे. दुसरीकडे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून, लोकपाल नियुक्तीसाठी विशेष आमसभा बोलविण्यास बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना व सचिव अमिताभ चौधरी यांनी नकार दिला आहे.
पांड्या आणि राहुल यांनी एका टीव्ही शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी बीसीसीआयने दोघांना निलंबित केले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने, बीसीसीआयचे संचालन करणाऱ्या सीओएने दोन्ही खेळाडूंच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी लोकपालाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी कोर्टापुढे केली. माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या गटाशी संबंधित १४ संलग्न राज्य संघटनांनी खन्ना यांच्याकडे विशेष आमसभा बोलविण्याची मागणी केली.
कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनीदेखील खन्ना यांना पत्र लिहून लोकपाल यांच्याबाबत निर्णयाआधी हे प्रकरण आमसभेपुढे चर्चेला आणण्याची विनंती केली. खन्ना यांनी मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून, ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली. त्यांनी काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न
केला.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की,प्रकरण न्यायप्रविष्ट असताना खन्ना किंवा अमिताभ यांनी एसजीएम बैठकीच्या नोटीसवर स्वाक्षरी करायला नको. यामुळे न्यायालयाची अवमानना होऊ शकते. (वृत्तसंस्था)
पांड्या, राहुल यांना खेळण्याची परवानगी द्या
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या निलंबनाबाबत विचार करण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्यास नकार देत बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी सीओएला पत्र लिहून तपास होईस्तोवर दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात खेळू देण्यास हरकत नाही, असे म्हटले आहे. दोन्ही खेळाडू न्यूझीलंडमध्ये भारतीय संघातून खेळू शकतील, असे खन्ना यांना वाटते.