मेलबोर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन रॉबर्टस् यांनी मंगळवारी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. कोरोना व्हायरसच्या काळात क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत ८० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय रॉबर्टस् यांनी घेतला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
रॉबर्टस् यांनी राजीनामा दिल्याची बातमी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हॅन्डलवरून दिली. त्यांनी सुपूर्द केलेला राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूरदेखील करण्यात आला. रॉबर्टस् यांच्या जागी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या निक हॉकले यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ साली जेम्स सदरलँड यांच्या जागी रॉबर्टस् यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा करार पुढील वर्षी संपणार होता, पण त्याआधीच त्यांनी अचानक राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर रॉबर्टस् यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)
‘मला या खेळाबद्दल आदर आहे. बोर्डात इतके मोठे स्थान भूषविण्याची संधी मिळाली, त्यासाठी स्वत:ला भाग्यवान मानतो. मला बोर्डाचे सीईओपद कायम पसंत होते, मी त्यावर असताना शक्य तितके चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या साथीने काम करत जे आपण मिळवले त्याचा मला अभिमान असून ज्यांनी मला सहकार्य केले, त्यांचा आभारी आहे,’