द हंड्रेड २०२६ या स्पर्धेच्या लिलावात सनरायझर्स लीड्ससंघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गुरुवारी लंडन येथील पिकाडिली लाइट्स येथे पार पडलेल्या या लिलावानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूची निवड केल्यामुळे सोशल मीडियावर काव्या मारन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असून हा निर्णय राष्ट्रीय भावनेच्या विरोधात असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी आपली बाजू मांडली.
डॅनियल व्हेटोरी म्हणाले की, संघाची पहिली पसंती इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल रशीद हाच होता. "आमच्या रणनीतीनुसार आम्हाला संघात एक जागतिक दर्जाचा फिरकीपटू हवा होता आणि आम्ही आदिल रशीदला डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र, लिलावादरम्यान सदर्न ब्रेव्ह संघाने आदिलवर मोठी बोली लावून त्याला आपल्या संघात खेचले," असे व्हेटोरी यांनी सांगितले.
रशीद हातचा गेल्यानंतर सनरायझर्स लीड्सकडे केवळ चार पर्याय शिल्लक होते. त्यापैकी अब्रार अहमद हा सर्वोत्तम पर्याय वाटल्याने संघाने त्याच्यावर १ लाख ९० हजार पौंड (सुमारे २.३४ कोटी रुपये) खर्च करण्याचा निर्णय घेतला. आम्ही केवळ क्रिकेटविषयक गरजांच्या आधारावर खेळाडूंचे मूल्यांकन करत होतो. अब्रार एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पॉवर प्ले किंवा मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची त्याची क्षमता संघासाठी उपयुक्त ठरू शकते. लिलावापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंच्या संदर्भात व्यवस्थापनात कोणतीही वेगळी चर्चा झाली नव्हती," असे स्पष्टीकरण व्हेटोरी यांनी दिले.
सनरायझर्स लीड्सचे एक्स अकाउंट निलंबित
अब्रार अहमदच्या निवडीनंतर भारतात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 'Boycott Sunrisers' सारखे ट्रेंड पाहायला मिळाले. याच गदारोळात सनरायझर्स लीड्सचे अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंट अचानक निलंबित करण्यात आले आहे. हे अकाउंट नेमके का निलंबित झाले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु यामुळे वादात अधिकच भर पडली आहे.
Web Summary : Sunrisers Leeds picked Pakistani spinner Abrar Ahmed in 'The Hundred' draft, sparking controversy. Coach Daniel Vettori clarified that Adil Rashid was their first choice, but Abrar was chosen based on cricketing merit after Rashid became unavailable. The team's X account was later suspended amidst the backlash.
Web Summary : सनराइजर्स लीड्स ने 'द हंड्रेड' ड्राफ्ट में पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमद को चुना, जिससे विवाद हो गया। कोच डेनियल वेट्टोरी ने स्पष्ट किया कि आदिल राशिद उनकी पहली पसंद थे, लेकिन राशिद के अनुपलब्ध होने के बाद अबरार को क्रिकेटिंग योग्यता के आधार पर चुना गया। विवाद के बीच टीम का एक्स अकाउंट बाद में निलंबित कर दिया गया।