सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकीण काव्या मारने हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 साठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोनला त्यांचा नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही बातमी क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे. कारण वरुण आरोनने २०२४ मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. पण त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये ५० विकेट्स घेता आल्या नाहीत. पण आता तो प्रशिक्षक म्हणून आपली नवी कारकीर्द सुरू करणार आहे.
वरूण आरोनची निवड म्हणजे रणनीती
आता आरोन गोलंदाजीऐवजी डगआउटमध्ये गोलंदाजांना तयार करण्याचे काम करेल. ही नियुक्ती SRH च्या नवीन रणनीतीचा एक भाग मानले जात आहे. याचा उद्देश गेल्या हंगामातील अपयश विसरून २०२६ मध्ये जेतेपद जिंकणे आहे. सनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. आयपीएल २०२५ मध्येही संघाची कामगिरी निराशाजनक होती, या खराब कामगिरीनंतर, फ्रँचायझीने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आणि आरोनची नियुक्ती केली.
२०१६ पासून जेतेपदाची प्रतीक्षा
या बदलाबद्दल चाहते उत्सुक आहेत. SRH ने २०१६ पासून एकही जेतेपद जिंकलेले नाही. उमरान मलिक सारख्या तरुण गोलंदाजांना वरुण आरोनच्या प्रशिक्षणाखाली त्यांचा वेग आणि अचूकता सुधारण्याची अपेक्षा आहे. आयपीएल २०२६ मार्चमध्ये सुरू होईल. सध्या हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या खेळाडूंचे ट्रेनिंग होणार आहे.