आयपीएलमधील लोकप्रिय संघ सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल झाल्या आहेत. इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये आपल्या सनरायझर्स लीड्स या संघासाठी एका पाकिस्तानी खेळाडूला संघात स्थान दिल्याने हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय चाहत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काव्या मारन यांना आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
२०२६ च्या द हंड्रेड लीगसाठी झालेल्या लिलावात काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्स फ्रँचायझीने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला २.३८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. अशा परिस्थितीत, एका भारतीय उद्योजिकेने परदेशी लीगमध्ये का होईना? पण पाकिस्तानी खेळाडूवर कोट्यवधींची उधळण केल्याने क्रिकेटप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
बीसीसीआयची भूमिका: राजीव शुक्लांचे स्पष्टीकरण
या वादावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हा विषय आयपीएलच्या किंवा आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यांनी ही खरेदी एका परदेशी लीगसाठी केली आहे. तो त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही."
सोशल मीडियावर 'बॉयकॉट'चा ट्रेंड
काव्या मारन या नेहमीच मैदानावर आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसतात. मात्र, अबरार अहमदच्या निवडीनंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला प्राधान्य देणे चुकीचे आहे, अशा आशयाच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. काहींनी तर त्यांना थेट आयपीएलमधून वगळण्याची मागणी केली आहे. अबरार अहमद हा या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने विकत घेतलेला पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे.