इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीच्या लिलावाआधी विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने विराटसह ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) व मोहम्मद सिराज ( ७ कोटी) यांनाच कायम राखण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी संघातील यशस्वी फलंदाज देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) याला रिलीज केल्याचा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. त्याच पडिक्कलला राजस्थान रॉयल्सने ७.७५ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले. आज त्याच पडिक्कलने रणजी करंडक स्पर्धेत पहिल्या दिवशी नाबाद १६१ धावांची खेळी केली.
२ कोटी मुळ किंमत असलेल्या पडिक्कलला २०१९मध्ये RCBने २० लाखांत ताफ्यात घेतले होते. आयपीएल २०२०त पडिक्कलने ३१.५३च्या सरासरीने १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या आणि संघाकडून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. २०२१मध्येही त्याने १४ सामन्यांत ४११ धावा केल्या. त्यात १ शतक व १ अर्धशतकाचा समावेश होता. तरीही पडिक्कलला रिलीज केल्याचा RCBच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. त्याच पडिक्कलने आज प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.