Join us

कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी

RCB Stampede Karnataka Highcourt: हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:37 IST

Open in App

१८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. ४७ जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. आता हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे. यामुळे कर्नाटक सरकारसह आरसीबी संघ प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. 

विराट कोहली आणि आरसीबी संघाच्या स्वागतासाठी सुमारे तीन लाखांवर लोक जमा झाले होते. बसमधून या खेळाडूंची रॅली अचानक रद्द करण्यात आली होती. तसेच हा विजयोत्सवाचा कार्यक्रम बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर ठेवण्यात आला होता. या स्टेडिअमची प्रेक्षकांची क्षमता ही काही हजारांत होती, यामुळे गेटवर प्रचंड गर्दी जमा झाली होती. यात चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा बळी गेला. या प्रकरणाची जबाबदारी ना सरकारने घेतली ना बीसीसीआय ने ना आरसीबीने. यामुळे हायकोर्टाने स्वत: याची दखल घेत सुनावणी ठेवली आहे. 

कर्नाटक सरकारने आपली जबाबदारी नाही असे म्हटले आहे. तो कार्यक्रम आरसीबी आणि चिन्नास्वामी स्टेडिअमने आयोजित केला होता. बंगळुरूचा संघ असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो होतो, असे गृहमंत्र्यांनी सांगत आपली जबाबदारी झटकली आहे. बीसीसीआयने आपल्याला या कार्यक्रमाबाबत कल्पना नव्हती असे म्हटले आहे. १२ तासांच्या आत पोलीस बंदोबस्त करणे कठीण होते, असे पोलीस खाते म्हणत आहे. आदल्या रात्रीच्या सामन्यामुळे आम्ही मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पोलीस दमलेले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. तर आरसीबी या लोकांच्या भावना होत्या. विजयोत्सवादरम्यान एकमेकांची काळजी घेण्याचे संदेश असूनही, अशी परिस्थिती उद्भवली, असे म्हणत आहे. 

यावर आता हायकोर्ट निर्णय घेणार असून या प्रकरणी उच्च स्तरीय समिती, चौकशी आणि जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीउच्च न्यायालयइंडियन प्रिमियर लीग २०२५आयपीएल २०२४कर्नाटकबेंगळूरचेंगराचेंगरी