Join us  

जगज्जेतेपदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कपिलनं शॅम्पेन कुठून आणली माहित्येय?... वाचाल तर हसाल!

1983 मधील विश्वविजेतेपदाला आज 35 वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:02 PM

Open in App

नवी दिल्लीः भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २५ जून १९८३ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. कारण, याच दिवशी क्रिकेटच्या पंढरीत - अर्थात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघानं जगज्जेतेपदाच्या झळाळत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. या विजयाला ३५ वर्षं पूर्ण होत असताना, माजी कर्णधार कपिल देव यांनी काही सुखद आठवणी जागवल्यात. त्यातली एक खूपच मजेशीर आहे. 

जग जिंकल्याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी भारतीय संघाने आणलेली शॅम्पेन उधार मागून आणली होती आणि ती देणारा उदार माणूस दुसरा-तिसरा कुणी नव्हे, तर पराभूत वेस्ट इंडीजचा कर्णधार क्लाइव्ह लॉइड होता. 

त्याचं झालं असं की, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८३ धावांत आटोपला होता. सामन्याचं पारडं वेस्ट इंडीजकडे झुकलं होतं. १९७५ आणि १९७९ चं जगज्जेतेपद पटकावणाऱ्या लॉइड कंपनीची ताकद सगळ्यांनाच माहीत होती. परंतु, जसजसा सामना सरकत गेला, तसतसं वेगळंच चित्र समोर आलं. कपिल देवचे शिलेदार विंडीजच्या फलंदाजांपुढे भारी ठरले आणि ४३ धावांनी भारतानं आपला पहिलावहिला विश्वविजय साकारला. 

या विजयानंतर, कपिल जेव्हा वेस्ट इंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांना भेटायला गेला, तेव्हा खोलीत सन्नाटा होता. एका कोपऱ्यात शॅम्पेनच्या भरपूर बाटल्या पडल्या होत्या. आपणच जिंकणार, असं वाटल्यानं विंडीज व्यवस्थापनानं भारताच्या इनिंग्जनंतरच त्या मागवून ठेवल्या होत्या. कपिलनं लॉइडशी हस्तांदोलन केलं आणि त्या बाटल्या घेऊ का, असं हळूच विचारलं. त्यावर लॉइडनं होकारार्थी मान हलवली आणि तो खिन्न मनाने जागेवर जाऊन बसला. लॉइडचा होकार मिळताच कपिल आणि मोहिंदर अमरनाथनं हव्या तेवढ्या बाटल्या उचलल्या आणि मग विश्वविजयाचं दणदणीत सेलिब्रेशन झालं. 

टॅग्स :कपिल देवक्रिकेटवेस्ट इंडिज