मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री जगजाहीर आहे. शालेय क्रिकेटदरम्यान या जोडीने विश्वविक्रमी भागीदारी करुन क्रिकेटविश्व गाजवले. यानंतर दोघांनी भारतीय संघात प्रवेश करुन आपली छाप पाडली. एकीकडे सचिनने जागतिक क्रिकेटवर राज्य केले, तर दुसरीकडे विनोदला मात्र लौकिकानुसार कामगिरी करण्यात यश आले नाही.
मात्र असे असले, तरी त्यांच्यातील मैत्री मात्र कायम राहिली व ती वेळोवेळी दिसूनही आला. पुन्हा एकदा या दोघांची घट्ट मैत्री चर्चेचा विषय ठरली आहे. कांबळीने त्याच्या दंडावर एक टॅटू गोंदवला असून यामध्ये सचिनचे नाव स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर कांबळीने पोस्ट टाकली आणि त्याच्या या हटके टॅटूला अनेक लाइक्स मिळाले. कांबळीने ट्वीट केले की, ‘आपण जीवनात बऱ्याच गोष्टी करतो, ज्या नेहमीच आपल्या सोबत राहत नाहीत. परंतु, हा मास्टर माझ्यासोबत नेहमीच राहणार आहे. हा टॅटूू माझ्या मित्राला समर्पित आहे.’ यावर सचिनने म्हटले की, ‘एवढी वर्षे आपण एकमेकांना ओळखतोय. माझा मित्र फार बदलला नाही. तू आजही मला सुखद धक्के देत राहतोस.’