Kagiso Rabada Gujarat Titans, IPL 2025: दक्षिण आफ्रिकेचा दमदार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळला होता, अशी माहिती खुद्द त्याने काही दिवसांपूर्वी दिली. ड्रग्स टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली. नियमानुसार त्याच्यावर ठराविक वेळेची क्रिकेटबंदी घालण्यात आली. पण आता त्याच्याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. रबाडा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी आढळल्याने त्याने अचानक स्पर्धा सोडली होती आणि तो मायदेशी परतला होता. पण तो पुन्हा एकदा लीगमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे.
SAT20 मध्ये दोषी, १ एप्रिलला समजला निकाल
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पुन्हा एकदा IPL मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो रिक्रिएशनल औषधांचा वापर केल्याबद्दल दोषी आढळला होता, ज्यामुळे त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले. साउथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्सनेजारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, SA20 लीगमध्ये MI केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर २१ जानेवारी रोजी रबाडा डोपिंग चाचणीत दोषी ठरला होता. १ एप्रिल रोजी IPL साठी तो भारतात असताना त्याला निकालाची माहिती देण्यात आली. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेला परतला.
कधी करणार पुनरागमन?
SAT20 स्पर्धेदरम्यान ड्रग्ज वापरल्याबद्दल त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, जी नंतर एक महिन्यापर्यंत कमी करण्यात आली. यानंतर त्याने अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. आता त्याची बंदी संपली आहे आणि तो IPL खेळू शकतो. याचा अर्थ असा की मंगळवारी गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात तो पुनरागमन करू शकतो. जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सी (WADA) अंतर्गत कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांच्या श्रेणीत बंदी असलेल्या ड्रग्जचे रबाडाने सेवन केले होते. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली गेली होती.