Kagiso Rabada Drug Test, IPL 2025: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अचानक आयपीएलमधून माघार घेऊन मायदेशी परतला. हे सारे अचानक घडले पण त्यामागचे कारण कळू शकलेले नव्हते. गुजरात टायटन्सने रबाडाला १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर रुपयांना खरेदी केले होते. तो या हंगामात फक्त २ सामने खेळू शकला. यानंतर, अचानक २ एप्रिलला रबाडा आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशात परतला. त्यानंतर असे म्हटले गेले की तो वैयक्तिक कारणांमुळे परतला आहे. अखेर रबाडाने आज मायदेशी परतण्यामागचे मौन सोडले. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या रबाडावर ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अचानक त्याला आयपीएल सोडून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागले. रबाडाने आपली चूक मान्य करत एक निवेदन जारी केले आहे.
२ मे रोजी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज ३ मे रोजी, रबाडाने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन (SACA) चा हवाला देत एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, त्याचा ड्रग टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अचानक आयपीएलमधून परतावे लागले होते. रबाडाने असेही सांगितले की सध्या त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
रबाडाने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, देण्यात आलेल्या वृत्तांनुसार, अलिकडेच मी आयपीएल सोडले आणि वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेला परतलो. हे घडले कारण मी रिक्रिएशनल ड्रगचा (ऊर्जावर्धक औषध) वापर केला आणि माझी ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी ज्यांना निराश केले आहे, त्या सर्वांची मी माफी मागतो. मी क्रिकेटला कधीच गृहित धरणार नाही. खेळ माझ्यापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. तो माझ्या वैयक्तिक गोष्टींपेक्षाही मोठा आहे. सध्या मी तात्पुरता निलंबित आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास उत्सुक आहे. या परिस्थितीत पाठिंबा दिल्याबद्दल SACA, गुजरात टायटन्स, त्यांचा स्टाफ आणि कायदेशीर सल्लागारांचे आभार मानतो. इथून पुढे मी आणखी मेहनत करेन.