Join us

कबड्डी : सन्मित्र क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत

सुरेश मंडळाने शिवशंभू मंडळाला २३-२२असे चकवित दुसरी फेरी गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 21:06 IST

Open in App

मुंबई उपनर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या  उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या किशोर गटात सुरेश क्रीडा मंडळ, सन्मित्र क्रीडा मंडळ, नवरत्न स्पोर्ट्स क्लब यांनी, तर किशोरी गटात गोरखनाथ क्रीडा मंडळ, निर्विघ्न स्पोर्ट्स क्लबने दुसरी फेरी गाठली.  किशोर गटात या निवड चाचणी स्पर्धेकरिता १६४ संघांनी, तर किशोरी गटात ३५ संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. किशोर गटात १६४ सामने, तर किशोरी गटात ३४ सामने असे या गटात एकूण  १९९ सामने होतील. किशोर-किशोरी गटातील सहभागी संघाचा उत्साह पहाता संयोजकांना हे सामने उरकने जिकरीचे झाले आहे. नेहरू नगर – कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हे सामने सुरू आहेत.

  किशोर गटात सुरेश मंडळाने शिवशंभू मंडळाला २३-२२असे चकवित दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला १०-०९अशी आघाडी घेणाऱ्या सुरेश मंडळाने उत्तरार्धात सावध खेळ करीत ही आघाडी कायम राखत हा विजय साकारला. साहिल जोशीलकर, सौरभ सातपुते सुरेशकडून, तर हर्ष बाचीम, लियोज डिसोझा यांनी उत्कृष्ट खेळ केला. सन्मित्र मंडळाने सह्याद्री मंडळाचा ३९-२५ असा पाडाव केला. विश्रांतीला २१-१० अशी आघाडी घेणाऱ्या सन्मित्रकडून निशान सकपाळ, नितीन तांबे उत्तम खेळले.  आदित्य वायदंडे, सुरज तेलंग पराभूत संघाकडून छान खेळले. नवरत्न स्पोर्ट्सने शरद आचार्य स्मृती प्रतिष्ठानला ३१-२१ अशी धूळ चारली. विश्रांतीला १६-१२ अशी आघाडी घेणाऱ्या नवरत्नने उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करीत १०गुणांच्या फरकाने विजय प्राप्त केला.दिगंबर संसारे, कौशल हारवडे या विजयात चमकले. आदित्य कात्रे, संदीप गौड यांनी प्रतिष्ठानकडून छान लढत दिली. याच गटात अणु कबड्डी संघाने स्वागत साई भजनचा ५५-११ असा, संघर्षने बाळवीरचा ५६-०५ असा, तर स्वराज्यने दादोजी कोंडदेवचा ३९-०७ असा पराभव करीत आगेकूच केली.

  किशोरी गटाचे सामने तसे एकातर्फीच झाले. गोरखनाथ क्रीडा मंडळाने अवंतिका मालपेकर, किरण साठे यांच्या झंजावाती खेळाच्या जोरावर स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ५६- १६ असा पाडाव केला. स्वस्तिकची राणी म्हस्के बऱ्यापैकी खेळली.  निर्विघ्नने यशवंत चादजी मंडळाचा ४७-१० असा पराभव केला. तन्वी कुढव, गार्गी मालवणकर यांना या विजयाचे श्रेय जाते. नवशक्ती अकादमीने युनिव्हर्सल स्पोर्ट्सचा ५९-१६ असा पाडाव केला.

टॅग्स :कबड्डी