मेलबर्न : भारतीय क्रिकेटपटू केवळ आयपीएल खेळतात. त्यांना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्यांच्याकडून खराब कामगिरी झाली, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने व्यक्त केले. भारताच्या कोणत्याही सक्रिय क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून विदेशातील कोणत्याही लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळत नाही.
वेस्ट इंडिजला २०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वविजेतेपद पटकावून दिलेल्या सॅमीने म्हटले की, जगभरात विविध टी-२० लीग खेळणाऱ्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. इंग्लंडचे खेळाडू विदेशी लीगमध्ये विशेषकरून ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही खेळतात आणि त्याचा त्यांना फायदा झाला. ॲलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन यांसारखे खेळाडू बिग बॅश लीग खेळत आहेत. त्यामुळे हा कोणताही योगायोग नाही, की इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली. इंग्लंडचा संघ सर्वात परिपूर्ण संघ होता आणि ते चॅम्पियन बनण्याचे खरे हक्कदार होते. दडपणाच्या सर्व सामन्यांतून त्यांनी सिद्ध केले की, त्यांच्याकडे सर्वोत्तम अष्टपैलू संघ आहे.