Azhar Ali retire : पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अलीने ९६ कसोटी आणि ५३ वन डे सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. अझर म्हणाला की, १७ डिसेंबरपासून सुरू होणारी पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील तिसरी कसोटी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची मॅच असेल.
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना अली भावूक झाला होता. तो म्हणाला, “पाकिस्तानसाठी हा माझा शेवटचा सामना असेल. पाकिस्तानकडून खेळताना माझ्या खूप गोड आठवणी आहेत. माझे सर्व प्रशिक्षक, माझे संघ सहकारी यांच्यासोबतच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. मी खूप आनंदी आहे. चाहत्यांनीही मला नेहमी प्रेम दिलं आहे."
अझर अलीची कसोटी कामगिरी
अझर अलीने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ९६ कसोटी सामने खेळले असून, त्याने ४२.५०च्या सरासरीने ७०९७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १९ शतकं आणि तीन द्विशतकं आहेत. २०१६-१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ३०२ आहे. त्याने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि लीड्स येथे ५१ धावा करताना संघाला सामना जिंकून दिला. फक्त युनूस खान (३४ ), इंझमाम-उल-हक (२५), मोहम्मद युसूफ (२४) आणि जावेद मियाँदाद (२३) यांनी अझर अली (१९) पेक्षा जास्त कसोटी शतके झळकावली आहेत.
वन डे क्रिकेटमध्ये अलीने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने ६५ चेंडूत ३९ धावा केल्या आणि पाकिस्तानने ५ गडी राखून सामना जिंकला. त्याने पाकिस्तानसाठी ५३ वन डे सामने खेळले आणि १८४५ धावा केल्या. त्याने आपला शेवटचा वन डे सामना जानेवारी २०१८ मध्ये खेळला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"