Join us  

कोहली व टीम इंडियासाठी जेएससीए ‘लकी’

आॅस्ट्रेलियाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरुवात येथील जेएससीए स्टेडियमवर करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 3:43 AM

Open in App

रांची : आॅस्ट्रेलियाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरुवात येथील जेएससीए स्टेडियमवर करणार आहे. हे स्टेडियम यजमान संघासह कर्णधार विराट कोहलीसाठी ‘लकी’ ठरले आहे.जवळजवळ ४० हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या झारखंड राज्य क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने आतापर्यंत एक कसोटी, चार वन-डे व एक टी-२० सामना खेळलेला आहे. त्यात केवळ एका वन-डे सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या मैदानावर सर्वाधिक धावा कोहलीच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. त्याने चार सामन्यांत एक शतक व एक अर्धशतक झळकावताना २६१ धावा फटकावल्या आहेत.जानेवारी २०१३ मध्ये उद््घाटनानंतर जेएनसीएला नोव्हेंबर २०१५ मध्ये कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. येथे एकमेव कसोटी सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध यंदा मार्च महिन्यात खेळला गेला. हा सामना अनिर्णीत संपला होता. ही लढत आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद १७८ धावा तर चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकी खेळीमुळे संस्मरणीय ठरली होती.माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गृहनगरातील या स्टेडियममध्ये पहिला वन-डे आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी २०१३ मध्ये खेळला गेला होता. त्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. नोव्हेंबर २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या विजयात कर्णधार कोहलीने वर्चस्व गाजवले होते. या मालिकेत धोनीला विश्रांती देण्यात आली होती आणि कोहलीने संघाचे नेतृत्व केले होते. कोहलीच्या नाबाद १३९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने अखेरची लढत जिंकून ५-० ने क्लीन स्वीप केला होता. या सामन्यात केदार जाधवने भारतीय संघात पदार्पण करताना २० धावा केल्या होत्या.भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान आॅक्टोबर २०१३मध्ये खेळलेली लढत पावसामुळे रद्द झाली होती. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २९५ धावा केल्या होत्या. त्यात जॉर्ज बेलीने ९८ व ग्लेन मॅक्सवेलने ९२ धावांची खेळी केली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने बिनबाद २७ धावा केल्या असता पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. बेली सध्याच्या संघात नाही; पण बिग हिटर मॅक्सवेलचा टी-२० संघात समावेश आहे. भारताने येथे अखेरचा वन-डे आॅक्टोबर २०१६ मध्ये खेळला होता; पण त्या वेळी न्यूझीलंडविरुद्ध यजमान संघाला १९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया