जोहान्सबर्ग : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यांनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणाऱ्या या खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्यूमिनीने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. मात्र, आफ्रिकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेट संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. ड्यूमिनीने सप्टेंबर 2017मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
''गेल्या काही महिन्यात मी संघाबाहेर आहे आणि आता मला पुन्हा संधी मिळाली आहे. विश्रांतीच्या या काळात मी भविष्याबाबतचा विचार केला. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ट्वेंटी-20 सामने खेळत राहणार आहे. पण, आता मला कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे,'' असे ड्यूमिनी म्हणाला.
ड्यूमिनीने 193 वन डे सामन्यांत 5047 धावा केल्या आहेत आणि 68 विकेट्सही घेतले आहेत.