चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 'ब' गटातील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ कराची येथील नॅशनल स्टेडियमवर साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहेत. इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आला आहे. दुसरीकडे या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ गटात अव्वलस्थानावर झेप घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. जोस बटलरसाठी कर्णधाराच्या रुपात हा शेवटचा सामना असणार आहे. या सामन्याआधीच त्याने कॅप्टन्सी सोडणार असल्याची घोषणा केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाविरुद्ध वाईट मार खाल्ला, पण अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव जिव्हारी लागला?
भारताविरुद्ध टॉस जिंकण्याचा सिलसिला अन् पदरी पराभवाची मालिका हा शो दाखवल्यावर इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामीच्या लढतीत ३५० धावा करुनही ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला मात दिली होती. पुढं जे घडलं ते आणखी भयावह होते. पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या संघानं इंग्लंडला धोबीपछाड दिली. इंग्लंडच्या अगदी तोंडचा घास पळवत अफगाणिस्तानच्या संघानं त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आउट केले. हा पराभव जोस बटलरच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अन् त्यामुळे त्याने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतलाय ही एक बाजू झाली. पण फक्त अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव हे एकमेव कारण नाही ज्यामुळे त्याच्यावर कॅप्टन्सी सोडण्याची वेळ आली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआदी टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेतही इंग्लंडचा संघ हतबल ठरला होता.
काय म्हणाला बटलर?
अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीत ३४ वर्षीय जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढती आधी जोस बटलरनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, "मी इंग्लंड संघाची कॅप्टन्सी सोडत आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य निर्णय वाटतो. माझ्या जागी कोणी तरी येईल अन् तो मुख्य कोच ब्रेंडन मॅक्युलमच्या साथीनं पुन्हा संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी अशाही त्याने व्यक्त केली."
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत चॅम्पियन कॅप्टनचा टॅग लागला, पण वनडे वर्ल्ड कपमध्ये पदरी पडली होती निराशा
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा, भारताचा दौरा इंग्लंडसाठी भयावह स्वप्नासारखा होता. एवढेच नाही तर २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाला साखळी फेरीतूनच घरचा रस्ता धरावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही माझ्या नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करण्याची परीक्षा होती आणि त्यात मी फेल झालोय, अशा आशयाच्या वक्तव्यासह त्याने कॅप्टन्सी सोडत असल्याचे सांगून टाकले. जून २०२२ मध्ये इयॉन मॉर्गन याच्यानंतर बटलरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. २०२२ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघानं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धाही जिंकली. पण त्यानंतर सातत्याने पदरी येणाऱ्या अपयशानंतर अखेर बटलरनं या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.