Join us

२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान

दमदार कामगिरीमुळे तब्बल वर्षभरानंतर 'त्याला' मिळाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:02 IST

Open in App

jordan cox: विकेटकीपर फलंदाज जॉर्डन कॉक्स हा द हंड्रेड लीग २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करून एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. जॉर्डन आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत आपली फलंदाजी दाखवणार आहे. द हंड्रेड २०२५ मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणाऱ्या जॉर्डनने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल २२ षटकार खेचले. याच फटकेबाजीच्या जोरावर तो लीगमध्ये सर्वाधिक ३६७ धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे अचानक त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. जॉर्डन हा ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळतो. या संघाने सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने जॉर्डनला संघात स्थान दिले आहे.

जॉर्डन कॉक्सला मिळालं मेहनतीचं फळ

द हंड्रेड २०२५ मध्ये शानदार कामगिरी करणारा यष्टीरक्षक फलंदाज जॉर्डन कॉक्सला आयर्लंडविरुद्धच्या ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. तो एका वर्षानंतर इंग्लंड संघात परतला आहे. त्याने शेवटचा टी२० सामना १३ सप्टेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही, परंतु द हंड्रेड लीगमध्ये कॉक्सने नीता अंबानींचा संघ ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या लीगमध्ये ९ सामने खेळले. त्यात त्याने ६१.६१ च्या सरासरीने ३६७ धावा केल्या. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता. या दरम्यान त्याने २२ षटकार आणि ३० चौकार मारले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कॉक्सची कामगिरी

इंग्लंड संघ १७ सप्टेंबरपासून आयर्लंड दौऱ्याला सुरूवात करेल. तिसरा आणि शेवटचा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघात समाविष्ट असलेल्या जॉर्डन कॉक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकी चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी २ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८.५० च्या सरासरीने फक्त १७ धावा केल्या आहेत. याशिवाय, कॉक्सने ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७.३३ च्या सरासरीने फक्त २२ धावा केल्या आहेत. आता तो आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याची सरासरी सुधारण्याचा प्रयत्न करेल.

टॅग्स :इंग्लंडआयर्लंड