नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. न्यूझीलंडच्या डावात श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर किवी संघ गारद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून शानदार शतक ठोकले. फिलिप्सच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला १६८ धावांचे तगडे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पूर्णपणे गारद झाला. ग्लेन फिलिप्सने ६४ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी करून आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज चितपट झाले. अखेर श्रीलंकेचा संघ २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९.२ षटकांत १०२ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने ६५ धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र हा सामना सुरू होण्याच्या आधी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले.
श्रीलंकेचे राष्ट्रगीत किती मोठे असल्याचे बेअरस्टोने म्हटले आहे. "श्रीलंकेचे राष्ट्रगीत जगातील सर्वात मोठे राष्ट्रगीत आहे का? काहींना तर इंग्रजीचा एक शब्दही आठवत नाही आणि दुसऱ्या बाजूबद्दल मला माहिती नाही. अशा स्थितीत ते लक्षात ठेवणं खूप कष्टाचं काम आहे." असे बेअरस्टोने ट्विटच्या माध्यमातून म्हटले. बेअरस्टोच्या या ट्विटवर श्रीलंकेचे युजर्स संताप व्यक्त करत आहेत. काही जण त्याला इतर देशांच्या राष्ट्रगीताचा आदर करण्याचा सल्ला देत आहेत, तर काही त्याला जुन्या विचारांचे इंग्रज म्हणत आहेत. तसेच काही युजर्स असेही म्हणत आहेत की बेअरस्टोने आपल्या ट्विटमध्ये कोणतीही चुकीची टिप्पणी केलेली नाही.
ग्लेन फिलिप्सचे शानदार शतक आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र किवी संघाला शानदार सुरूवात करता आली नाही. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून ६४ चेंडूत १०४ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या होत्या.
बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात निराशाजनक झाली. श्रीलंकेला पहिल्यापासून झटके बसत गेले. संघाची धावसंख्या १ असताना पाथुम निसंका बाद झाला, त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिस तंबूत परतला. कोणताच फलंदाज न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीचा सामना करण्यात यशस्वी झाला नाही. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या २४ धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ बाद झाला होता. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने ३५ धावांची सावध खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तोही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याला ट्रेन्ट बोल्टने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्याव्यतिरिक्त भानुका राजपक्षेने २२ चेंडूत ३४ धावांची ताबडतोब खेळी केली मात्र लॉकी फर्ग्युसनने त्याला तंबूत पाठवले. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक ४ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे बोल्टने ४ षटकांत केवळ १३ धावा देऊन ४ बळी पटकावले. तर मिचेल सॅंटनरने आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय टीम साउदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. न्यूझीलंडच्या संघाने आज मिळवलेल्या विजयामुळे ५ गुणांसह उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. त्यामुळे श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आगामी सर्व सामने जिंकणे गरजेचे असतील. कारण श्रीलंकेचे आता केवळ २ गुण आहेत. तर ग्रुप ए मध्ये इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ३ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर स्थित आहे. श्रीलंकेचा संघ क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"