Join us

पहिल्याच सामन्यानंतर भावाची हत्या, तरीही 'तो' खेळला अन् देशासाठी वर्ल्ड कप जिंकला 

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना सर्वांच्या कायम लक्षात राहील. या सामन्याचा निकाल काहीच लागला नाही, केवळ अन् केवळ इंग्लंडचे चौकार अधिक होते म्हणून त्यांना जेतेपदाचा मान मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:02 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना सर्वांच्या कायम लक्षात राहील. या सामन्याचा निकाल काहीच लागला नाही, केवळ अन् केवळ इंग्लंडचे चौकार अधिक होते म्हणून त्यांना जेतेपदाचा मान मिळाला. 44 वर्षांचा त्यांचा वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपला. पण, याच संघातील एका खेळाडूवर पहिल्याच सामन्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तरीही तो न खचता संपूर्ण स्पर्धेत खेळला आणि इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटाही उचलला. कोण आहे तो खेळाडू ?

न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 241 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यातही 15-15 अशी बरोबरी झाली. इंग्लंडचे चौकार अधिक होते म्हणून त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुःख विसरून संपूर्ण स्पर्धेत जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळला. 24 वर्षीय जोफ्रानं पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत 20 विकेट्स घेत इंग्लंडकडून सर्वात यशस्वी गोलंदाजांना मानही मिळवला. 

इंग्लंडने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानं केली. या सामन्याच्या पुढच्याच दिवशी जोफ्राचा चुलत भाऊ एंशेटियो ब्लॅकमॅनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भावाच्या हत्येबद्दल कळताच जोफ्राला मोठा धक्का बसला होता. पण, तरीही तो जिद्दीनं खेळला आणि संघाला जेतेपद जिंकून दिले. जोफ्राचा भाऊ याचेही वय हे 24 वर्षाचेच होते आणि दोघांची मैत्री घट्ट होती, असे जोफ्राचे वडील फ्रँक यांनी सांगितले.

जोफ्राचा भाऊ ब्लॅकमॅनची हत्या 31 मे रोजी त्याच्या घराच्या बाहेरच करण्यात आली. रात्री साडेआठच्या सुमारास ब्लॅकमॅन घराबाहेर बसला असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्त्या केली. हा हल्ला झाला त्यावेळी ब्लॅकमॅची गर्लफ्रेंड आणि चार वर्षांचा मुलगा घरात होते. त्यामुळे हल्ला नेमका कोणी केला हे त्यांनाही कळले नाही. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंड