दुबई : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने पुन्हा एकदा आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. यासह तो श्रीलंकेचा कुमार संगाकारानंतरचा दुसरा वयस्कर अव्वल फलंदाजही ठरला. त्याचवेळी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि शुभमन गिल या भारतीय फलंदाजांना खराब कामगिरीचा फटका बसला असून तिघांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
लॉर्ड्स मैदानावर रूटने भारताविरूद्ध १०४ आणि ४० धावा केल्या. या जोरावर तो आठव्यांदा अव्वल फलंदाज ठरला. संगकाराने २०१४ साली वयाच्या ३७ व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर ३४ वर्षीय रूट हा मान मिळवणारा दुसरा वयस्कर फलंदाज ठरला. रूटने एका स्थानाने प्रगती करताना न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला दुसऱ्या स्थानी खेचले. इंग्लंडचाच हॅरी ब्रूक तिसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताच्या यशस्वीची एका स्थानाने पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऋषभ पंतही एका स्थानाने आठव्या स्थानावर घसरला असून कर्णधार गिल तब्बल तीन स्थानांनी नवव्या क्रमांकावर आला आहे.
बुम...बुम... बुमराहगोलंदाजांच्या क्रमवारीत स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा दबदबा कायम राहिला असून त्याने सर्वाधिक ९०१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान अधिक बळकट केले आहे. यानंतर कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका, ८५१), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया, ८३८), जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया, ८१५) आणि नोमान अली (पाकिस्तान, ८०६) यांचा क्रमांक आहे. अव्वल दहामध्ये पाच स्थान मिळवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व राखले आहे.
‘सर’ जडेजाचा कमालस्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतक झळकावून आपली छाप पाडली. या जोरावर त्याने कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. त्यानंतर मेहिदी हसन मिराझ (बांगलादेश), वियान मुल्डर (दक्षिण आफ्रिका), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) आणि मार्को यान्सेन (दक्षिण आफ्रिका) यांचा क्रमांक आहे.