Join us

जिगरबाज ! उन्मुक्त चंदने करून दिली कुंबळेची आठवण, जबडा तुटलेला असतानाही शानदार शतक  

सामना संपल्यानंतर सहकारी खेळाडूंनी उन्मुक्तची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अशीच घटना 2002 मध्ये वेस्टइंडिज दौ-यावर  एंटिगुआ कसोटी सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबत घडली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:36 IST

Open in App

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने उत्तर प्रदेशचा 55 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताला 2012 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद याने जिगरबाज खेळी केली. त्याच्या शानदार शतकी खेळीचं आणि त्याने दाखवलेल्या धैर्याचं क्रिकेटवर्तुळात कौतुक होत आहे. उन्मुक्त चंदने जबडा तुटलेला असतानाही जबरदस्त शतकी खेळी केली आणि दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेशचा कर्णधार अक्षदीप नाथने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दिल्लीचे सलामीवीर हितेन दलाल आणि उन्मुक्त चंद यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली, 5७ धावांवर दलाल बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण जबडा तुटलेला असतानाही उन्मुक्त चंद मैदानावर तळ टोकून होता. या सामन्याआधी सरावादरम्यान उन्मुक्त चंद जखमी झाला होता, पण तरीही त्याने सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापर्यंत उन्मुक्त चंदच्या बॅटमधून अपेक्षेप्रमाणे धावा निघत नव्हत्या पण या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकलं आणि सर्वांची मनं जिंकली. त्याने 125 चेंडूंमध्ये 116 धावांची धमाकेदार खेळी केली यामध्ये 12 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याच्या खेळीच्या बळावर दिल्लीने 50 षटकांमध्ये 6 विकेट गमावून 307 धावा केल्या. 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा डाव 252 धावांमध्ये आटोपला आणि दिल्लीने 55 धावांनी विजय साजरा केला . सामना संपल्यानंतर सहकारी खेळाडूंनी उन्मुक्तची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अशीच घटना 2002 मध्ये वेस्टइंडिज दौ-यावर  एंटिगुआ कसोटी सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबत घडली होती. उन्मुक्त चंदला या वर्षी खराब फॉर्ममुळे आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. पण या जिगरबाज खेळीनंतर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.  

 

टॅग्स :क्रिकेटउन्मुक्त चंद